सांगली (Sangli) : म्हैसाळ उपसा सिंचनच्या विस्तारित योजनेसाठी आवश्यक असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील कृष्णा नदीवरील बॅरेजच्या बांधकामासाठी सोमवारी टेंडर जाहीर करण्यात आले. १८६ कोटी ६० लाख रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी म्हैसाळची विस्तारित योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी चांदोली धरणातील सहा टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. म्हैसाळ येथे सध्या कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून तेथे कमी प्रमाणात पाणी अडवले जाते. त्या ठिकाणी मोठे बॅरेज वजा छोटे धरण बांधून तेथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्याचे या विस्तारित योजनेत नियोजन आहे. ही एकूण योजना १ हजार ९०० कोटींची असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात १००० कोटींचा निधी मंजूर केला आहे. बंदिस्त पाईपलाईनद्वारे जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणी नेण्याचे नियोजन असून त्यासाठी म्हैसाळ येथील बॅरेज अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार जयंत पाटील हे जलसंपदामंत्री असताना त्यांनी या विस्तारित योजनेला मंजुरी दिली आणि त्याचवेळी चांदोली धरणातील ६० टीएमसी पाण्याचा अतिरिक्त साठा म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी मंजूर करून घेतला होता. त्या वेळी त्यांनी म्हैसाळ येथे बॅरेज बांधतानाच सांगली येथील बंधारा पाडण्याबाबतचे सुतोवाच केले होते. बंधारा पाडण्याच्या त्यांच्या निर्णयाला सांगलीकरांनी कडाडून विरोध केला. मानवी साखळी करण्यात आली आणि बंधारा पाडण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे सध्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जाहीर केले. आता त्या योजनेतील महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे म्हैसाळ येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाडून तेथे बॅरेज बांधण्याचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी १८६ कोटी ६० लाख रुपये इतक्या रकमेचे टेंडर काढण्यात आले आहे.
जतच्या पूर्व भागाला शाश्वत पाणी
जत तालुक्याच्या पूर्व भागात सीमावर्ती भागातील गावांमध्ये या योजनेतून पाणी पोहोचवले जाणार आहे. सध्या या गावांमध्ये कर्नाटकातील तुबची बबलेश्वर या योजनेतून पाणी दिले जाते. त्याबाबतचा करार करावा असाही प्रयत्न राजकीय पातळीवर सुरू आहे. त्याचवेळी म्हैसाळ विस्तारित योजनेचे कामही आता सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत जतच्या पूर्व भागात शाश्वत स्वरूपात पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.