sweeping machine Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

कमाल….टेंडर पे टेंडर; तेही स्विपिंग मशीनसाठी

टेंडरनामा ब्युरो

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्विपींग मशीनचे टेंडर पे टेंडर निघाले पण प्रत्यक्ष मशीन काही महापालिकेच्या हाती पडत नसल्याचे चित्र आहे. प्रति किलोमीटर ५६७ रूपये इतक्या दराने साफसफाई होणार आहे. पुर्वी अशा मशीनचा प्रयोग झाला तो ही फारसा यशस्वी झाला नाही. रस्त्यांची साफसफाई होण्यापेक्षा ठेकेदाराला किती रक्कम मिळाली याची चर्चा अधिक झाली.

नंतर महापालिकेने टेंडर मागविले. भाडेतत्वावर मशिन घेतले जाणार होते. गेल्या सहा महिन्यापासून यासंबंधीच्या फाईलचा प्रवास सुरू आहे. तो अद्याप पूर्ण झालेला नाही. स्विपिंग मशीन येणार कधी आणि स्वच्छता होणार कधी असाच प्रश्‍न शहरवासियांना पडला आहे. शहरात आयआरबीने सुमारे ४९ किलोमीटरचे रस्ते बांधले. रस्त्यांच्या बाजूपट्ट्यांची झाडलोड महापालिका कर्मचाऱ्यांकडून होते. मात्र, मोठे रस्ते, डिव्हायडर याची झाडलोड कर्मचाऱ्यांकडून शक्य नसते. स्विपिंग मशिनशिवाय हे शक्य होत नाही. स्टेशन रोड ते शिरोली कमान, ताराराणी चौक ते डीएसपी कार्यालय, ताराराणी चौक ते व्हिनस कॉर्नर, आयसोलेशन रिंगरोड, कृषी महाविद्यालय ते शिवाजी विद्यापीठ, शाहू नाका, विद्यापीठ ते सायबर, रेसकोर्स ते कळंबा, कसबा बावडा येथे शिये टोलनाका, आपटेनगर ते तलवार चौक, जावळाचा बालगणेश ते फुलेवाडी नाका हे रस्ते आकाराने मोठे आहेत. रस्त्यावर २४ तास वर्दळ असते. वाहनांच्या धुरांमुळे रस्ते काळवंडले आहेत.

डिव्हाएडरमध्ये धूळ साचून आहे. झाडे माना टाकू लागली आहेत. शिरोली नाका शहराचे प्रवेशद्वार, मुंबईहून मोठ्या संख्येने प्रवासी वाहने तसेच आरामगाड्या, तसेच मालवाहू गाड्या रस्त्याने येतात. ताराराणी चौकापर्यंत दोन्ही बाजूंनी वर्दळ असते. शहरातील रस्ते स्वच्छ आहेत, त्यावर त्या शहराचा लूक अवलंबून असतो. प्रमुख रस्ते धुळीने माखले आहेत. दिवसेंदिवस रस्त्यावरील धूळ वाढत चालली आहे. महापालिकेने मध्यंतरी स्विपिंग मशिनचा प्रयोग केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही.