Jal Jeevan Mission Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

‘जलजीवन’च्या कामात दिरंगाई नको; ‘सीईओ’ यांचा अधिकाऱ्यांना इशारा

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : ‘‘जलजीवन मिशन’अंतर्गत सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. बोटावर मोजता येतील एवढ्या काही लोकांच्या निष्क्रियतेमुळे जर सर्व व्यवस्था बदनाम होत असेल, तर अशा लोकांना घरी बसवावे लागेल. वेळीच सावध होऊन कामाला लागा,. ‘जलजीवन’च्या कामात दिरंगाई मी खपवून घेणार नाही,’’ असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकाऱ्यांना दिला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘जलजीवन मिशन’च्या सर्वच कामांचा आढावा स्वामी यांनी घेतला. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

स्वामी म्हणाले, ‘‘जलजीवन’च्या ठेकेदारांनी मिळालेल्या या संधीचे सोने करावे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. आपल्या हातून या योजनेची कामे दर्जेदार झाली. तर यातून मनस्वी समाधान मिळेल. तसेच आपला व्यवसाय भविष्यकाळात वाढणार आहे. याकामी जर दिरंगाई अथवा निष्काळजीपणा झाला, तर काळ्या यादीत टाकल्यास आपले भवितव्य संपणार आहे. याबाबी लक्षात घेऊन कामे करा. ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून अंगणवाडी व शाळांना दिलेल्या नळ जोडच्या कामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याचीही तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. चांगल्या कामांची यशकथा करा. गावकऱ्यांच्या समस्या तिथेच सोडवा. कामे चालू आहेत तिथे बोर्ड लावा, अंतिम टप्प्यात असलेली आणि शिल्लक कामे लवकर पूर्ण करा. ‘जलाजीवन मिशन’च्या कामांबाबत यापुढे कोणतीही तक्रार चालणार नाही,’’ अशा सूचनाही त्यांनी केल्या. कटकधोंड यांनी जिल्ह्यात ८५५ पैकी २४ कामे पूर्ण असून ६०५ कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती दिली.

‘तुमच्यावर वेळ येऊ देऊ नका’
‘‘नुकतेच शौचालय अनुदान वितरणाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या जिल्ह्यातील २२ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत. तुमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका,’’ असा इशाराही स्वामी यांनी ‘जलजीवन मिशन’च्या कर्मचाऱ्यांना दिला.