Solapur Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : सोलापूरकरांना पोलिसांनी का ठोठावला सव्वा कोटींचा दंड?

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : रस्त्यांवरून ये-जा करताना अनेक वाहने फॅन्सी नंबरप्लेट लावून बिनधास्तपणे फिरतात. याशिवाय अनेक वाहनचालक पूर्वीचे मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर लावतात. अशा प्रत्येक वाहनाला वाहतूक पोलिसांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड केला जातो. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी एक कोटी ३८ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

सोलापूर शहर परिसरात मागील दोन वर्षांत शंभरहून अधिक जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे आरटीओकडील आकडेवारीतून स्पष्ट होते. वाहतूक पोलिसांकडून वारंवार बेशिस्त वाहनांवर कारवाई केली जाते, तरीदेखील अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. महामार्गांवरून ये-जा करताना दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती जरुरी आहे, पण शहरातील वाहनांना हेल्मेट सक्ती आहे की नाही यावर संभ्रम आहे.

अनेकदा वाहतूक पोलिस रस्त्यात आडवे जाऊन वाहनांना बाजूला घेतात. त्यावेळी इन्शुरन्स, पीयूसी, आरसीबूक, वाहन परवाना अशी सर्व कागदपत्रे असल्यानंतर हेल्मेटबाबत विचारणा केली जाते. त्यावेळी हेल्मेट नसल्याचा दंड केला जातो ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे अनेक वाहनचालक आपल्या वाहनांचे नंबरप्लेट व सायलेन्सरमध्ये बदल करून वाहने चालवितात. त्यांच्यावर आता पोलिसांनी फोकस केला आहे.

निवडणुकीनंतर मात्र, शहरातील चौकाचौकात विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक वाहनचालकांना नियमांचे पालन करावेच लागणार आहे. अपघातांवर नियंत्रण हा त्यामागील हेतू असणार आहे.

बेशिस्त वाहनांवरील कारवाईची स्थिती

कारवाईचा कालावधी : १० महिने

मॉडिफाइड सायलेन्सरची वाहने : १५८९

फॅन्सी नंबरप्लेटची वाहने : १२,२१८

एकूण दंड : १.३८ कोटी

प्रत्येक वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या काळात मॉडिफाइड सायलेन्सर लावणारी वाहने व फॅन्सी नंबरप्लेटच्या सुमारे १२ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय वाहनाचा इन्शुरन्स नाही, पीयूसी नाही, फिटनेस प्रमाणपत्र नाही, अशा वाहनांवरही कारवाई केली जात आहे.

- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर