पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर विभागातील रेल्वेच्या दुहेरीकरणाचे ‘तारीख पे तारीख’

टेंडरनामा ब्युरो

वैभव गाढवे, देऊळगावकर, सोलापूर

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दुहेरीकरणाचे काम २०१२ पासून सुरू आहे. सुरूवातीला पाच ते सहा वर्षांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासन आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने व्यक्त केला होता. तेव्हा प्रकल्पाची किंमत १६ ते १८ कोटीच्या आसपास होती; मात्र आता नऊ वर्षांनंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. सप्टेंबर २०२१ अखेर वाशिंबे ते भाळवणीपर्यंत दुहेरीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचा दावा आता रेल्वे प्रशासन करत आहे; तर भाळवणी ते भिगवणदरम्यान मार्च २०२२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तब्बल दहा वर्षाच्या विलंबामुळे प्रकल्पाच्या मूळ किंमतीतही मोठी वाढ झाले असल्याची शक्यता आहे.

सोलापूर विभागांतील रेल्वे प्रवास वेगवान, सुखकर व्हावा आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी २०१२ पासून दुहेरीकरणाच्या कामास सुरूवात झाली; मात्र सोलापूरकरांना अद्यापही हे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, रेल्वेचा अतिशय दुर्गम भाग असलेल्या कोकण रेल्वेचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सोलापूर विभागातील कामानंतर हाती घेण्यात आले होते. ते आता पूर्ण झालेही आहे. मग सोलापूर विभागाचेच काम अजून का रखडलेले आहे, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

रेल्वे प्रशासनांतील बड्या अधिकाऱ्यांना भेट दिल्यास केवळ ‘तारीख पे तारीख’ दिली जाते; मात्र प्रत्यक्ष काम केव्हा पूर्ण होईल, याबाबत निश्चित माहिती दिली जात नाही. दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विभागांतून नवीन गाड्या सुरु होतील. वाशिंबे ते भिगवण दरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे सोलापूरकरांची लाईफलाईन समजली जाणारी हुतात्मा एक्‍सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर याच कामासाठी इंद्रायणी एक्‍सप्रेसदेखील पुण्यापर्यंत सुरू आहे. त्यामुळे दुहेरीकरणाचे काम आता तरी मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार की, आणखी तारीख वाढणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागलेले आहे.