Mantralaya Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : आरोग्य भरतीत सावळा गोंधळ; अनेक संस्था चालकांचे मौन काय सांगतेय?

टेंडरनामा ब्युरो

Solapur News सोलापूर : ‘निर्णय वेगवान, गतिमान महाराष्ट्र’ असे म्हणणाऱ्या राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सरळसेवा गट क व ड संवर्गातील पदभरतीची जाहिरात ऑगस्ट २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली. परीक्षा होऊन सहा महिने उलटूनही अद्याप एकालाही नेमणूक मिळालेली नाही.

दुसरीकडे आरोग्य निरीक्षक व आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी उमेदवारांनी दिलेली स्वच्छता निरीक्षक डिप्लोमाची प्रमाणपत्रेच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. सहसंचालकांनी चारवेळा आदेश काढूनही प्रमाणपत्रे दिलेल्या संस्थांनी मान्यतेसह इतर माहिती दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.

बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरूष), आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक पदांसाठी आरोग्य व कुटुंब कल्याण किंवा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर यांच्याकडील आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक तथा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण असणे बंधनकारक आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क व ड’मधील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक व आरोग्य सेवक अशा एकूण १९६४ पदांसाठी ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर व १२ डिसेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा झाली. त्यावेळी आरोग्य निरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त संस्थांमधून स्वच्छता निरीक्षकाचा डिप्लोमा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे उमेदवारांनी सादर केली. त्यात अस्तित्वात नसलेल्या संस्थांचेही प्रमाणपत्र असल्याचा संशय असल्याने त्याची पडताळणी आता राज्यस्तरीय समितीमार्फत होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सरळसेवा पदभरतीत उमेदवारांनी ज्या संस्थांचे सॅनिटरी इन्स्पेक्टरची प्रमाणपत्रे दिली आहेत, त्या संस्थांनी १९ मुद्द्यांची माहिती पुण्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाला सादर करायची आहे.

सहसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी १ एप्रिल व १९ एप्रिल २०२४ आणि १० मे २०२४ व आता पुन्हा ६ जूनला त्यासंबंधीचेच आदेश काढले. मात्र, बहुतेक संस्थांनी मागील तीन महिन्यांत कागदपत्रेच सादर केलेली नाहीत.

नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कारवाई आणि पात्र उमेदवारांना तात्काळ नेमणुका द्याव्यात, अशा मागण्या करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तरीदेखील, संबंधित संस्थांवर कोणतीही कारवाई झालेली नाही हे विशेषच.

आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी स्वच्छता निरीक्षकाचे प्रमाणपत्र जरूरी आहे. उमेदवारांनी दिलेली प्रमाणपत्रे ज्या संस्थांची आहेत, त्या ७२ संस्थांना मुदत देऊन त्यांच्याकडील मान्यतेसह अन्य १९ मुद्द्यांची माहिती मागविली आहे. अनेकांनी माहिती दिलेली नाही. ज्या संस्थांची माहिती प्राप्त झाली आहे, त्याची पडताळणी राज्यस्तरावर नेमलेली समिती करणार आहे.

- डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य सेवा

‘सार्वजनिक आरोग्य’च्या पदभरतीचा प्रवास

- जाहिरात प्रसिद्ध : २८ ऑगस्ट २०२३

- ऑनलाइन परीक्षा : ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२३

- परीक्षेचा निकाल : १९ फेब्रुवारी २०२४

- पात्र उमेदवारांना नियुक्ती : अजूनही नाही