ZP School Students Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा 28 शाळांना का बसला फटका? का रखडले बांधकाम?

टेंडरनामा ब्युरो

Solapur News सोलापूर : राष्ट्रीय महामार्गामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २८ शाळा बाधित झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी केवळ सात शाळांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नुकसानीपोटी मिळालेली कमी रक्कम, फेरमूल्यांकन, जागेचा अभाव, प्रशासकीय मंजुरीअभावी ही कामे रखडली आहेत.

वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे जिल्ह्यातील शाळा बाधित झाल्या आहेत. धर्मपुरी, जाधववस्ती, सावंतवाडी (दसूर), पोखरापूर व तिऱ्हे या पाच शाळांचे मोठे तर उर्वरित शाळांचे किरकोळ व मध्यम नुकसान झाले आहे. त्यांचे नव्या ठिकाणी स्थलांतर करुन बांधकाम करावयाचे आहे. त्यासाठी अनुदान मिळाले आहे.

सात जागा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांकडे हस्तांतरित केल्या आहेत. त्यानुसार तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर), दिघेवाडी (ता. सांगोला), शिंदेवस्ती (वाटंबरे, ता. सांगोला), गणेशवाडी (ता. मंगळवेढा), धरणवाडी (आंधळगाव, ता. मंगळवेढा), गोडसेवस्ती (कमलापूर, ता. सांगोला) व कमलापूर (ता. सांगोला) या शाळांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यापैकी तिऱ्हे शाळेचा ताबा अद्याप जिल्हा परिषदेला मिळालेला नाही.

नऊ शाळांचे बांधकाम टेंडर स्तरावर आहे. धर्मपुरी, जाधववस्ती, सावंतवाडी (ता. माळशिरस) या शाळांसाठी अनुदानातून जागा खरेदी केली आहे. मात्र, धर्मपुरी शाळेसाठी भरपाईपोटी कमी रक्कम मिळाली आहे. तर पोखरापूर शाळेसाठी लोकसहभागातून निधी उभारण्यात आला आहे. परंतु फेरमूल्यांकन, अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मंजुरी आदी विविध कारणांनी या शाळांसह बोंडले, हगलूर, देगाव, कुंभारी मुलांची शाळेचे बांधकाम रखडले आहे. इंचगाव, इंदिरानगर (बेगमपूर) या शाळांचे फेरमूल्यांकन प्रस्ताव २१ जून २०२१ रोजी संबंधित प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप फेरमूल्यांकन झाले नाही.

१० शाळांचे किरकोळ व मध्यम स्वरुपात नुकसान झाले आहे. जागेचा उतारा नसणे, अनुदानाचा अभाव यामुळे ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा), खांडेकरवस्ती (भंडीशेगाव, ता. पंढरपूर), श्रीरामवस्ती (हत्तीज, ता. सांगोला), पुरंदावडे, घुलेवस्ती (ता. माळशिरस), कर्जाळ (ता. अक्कलकोट), वळसंग, लिंबीचिंचोळी (ता. दक्षिण सोलापूर) या शाळांचे काम रखडले आहे. तर मोरोची (ता. माळशिरस) येथील अंगणवाडीच्या बांधकामासाठी अजुनही निधी मिळाला नाही.

सीईओंच्या सूचनेनंतरही कामांचीही सुरुवात नाही

राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित शाळांचे बांधकाम तीन - चार वर्षांनंतरही पूर्ण झाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी, मुख्याध्यापक व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यानंतरही २१ शाळांच्या बांधकामास सुरवात होऊ शकली नाही.

महामार्गामुळे बाधित शाळांची आकडेवारी व स्थिती

  • शाळा बाधित तालुके ८

  • बाधित शाळांची संख्या २८

  • बाधित अंगणवाडी संख्या ०१

  • मोठे नुकसानग्रस्त शाळा ०५

  • मध्यम नुकसानग्रस्त शाळा २३

  • बांधकाम पूर्ण झालेल्या शाळा ०७

  • बांधकाम रखडलेल्या शाळा २१

  • बांधकाम रखडलेली अंगणवाडी ०१

  • टेंडर स्तरावरील शाळा ०९

  • फेरमूल्यांकनामुळे प्रलंबित ०२

  • निधी, जागेअभावी प्रलंबित १०