सोलापूर (Solapur) : राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर शहर धुळमुक्त करण्याच्या उद्देशाने नई जिंदगी येथील रस्त्याचा अपवाद वगळता सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. छत्रपती संभाजी महाराज चौकातील रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश येत्या दोन आठवड्यात देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.
राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत शासनाकडून सोलापूर महापालिकेला एकूण २२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सोलापूर शहरातील रस्ते व दुभाजक धुळमुक्त करण्याच्या उद्देशातून एकूण १८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी नई जिंदगी येथील एका रस्त्याचे काम ड्रेनेज लाईनसाठी राहिले आहे. इतर सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी हिरवे पट्टे व इतर पर्यावरण पूरक सुशोभीकरणाची कामे करण्यात येत आहेत. यामुळे सोलापूर शहर धुळमुक्त होण्यासाठी हातभार लागणार आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे टेंडर काढण्यात आले आहे. हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ ५४ मीटर रस्त्याचे काम दोन्ही बाजूने सुरू
रेल्वे प्रशासनाकडून बोगद्याचे काम सन २०१७ पासून रखडले होते. महापालिका प्रशासनाकडून तब्बल १८ कोटी रुपये यासाठी रेल्वे प्रशासनाकडे जमा करण्यात आले होते. तरीही काम प्रलंबित होते. अखेर महापालिका प्रशासनाने याचा पाठपुरावा केला आणि या बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर येथील ५४ मीटर रस्त्याचे राहिलेले कामही दोन्ही बाजूनी सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्नही आता मार्गी लागत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.