सोलापूर (Solapur) : राज्याच्या सर्वाधिक रस्ते अपघात व अपघाती मृत्यू होणाऱ्या जिल्ह्याच्या यादीत सोलापूर सतत Top 10 मध्येच आहे. कितीही अधिकारी बदलले तरीदेखील अपघात नियंत्रणात आणता आलेले नाहीत. जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या काळात जिल्ह्यातील एक हजार ५३ अपघातात ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रस्ता सुरक्षा समित्यांची बैठक नियमित होवूनही महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत हे विशेष. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोळेगाव ते टेंभूर्णी या अंतरात हजारो खड्डे पडल्याची वस्तुस्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यात महामार्गांचे जाळे विस्तारले असून वाहनांचा वेगही वाढला आहे. पण, अनेक गावांजवळ महामार्गावरील दुभाजक तोडून वाहन चालकांनी शॉर्टकट मार्ग काढल्याचीही वस्तुस्थिती आहे. जड वाहने ज्या बाजूने जातात तो मार्ग खचल्याने लेन कटिंगचे प्रमाण वाढले आहे.
वास्तविक पाहता महामार्गांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट तर चारचाकी चालकांना सीटबेल्ट वापरण्याचे बंधन आहे, पण महामार्ग पोलिस केवळ टोल नाक्यांवर ठाण मांडून असतात. इंरटसेप्टर वाहने खड्डे असलेल्या ठिकाणी नव्हे तर उतारावर थांबलेली असतात, ज्याठिकाणी वाहनांचा वेग उतारामुळे वाढलेला असतात तेथेच ही वाहने थांबलेली असतात हे विशेष.
एकूणच अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची तिहेरी यंत्रणा असताना देखील अपघात कमी का होत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांकडेच नाही हे विशेष. कोट्यवधींचा टोल वसूल करणाऱ्या यंत्रणेला महामार्गावरील खड्डे का दिसत नाहीत, असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
महामार्गाची अशी आहे सद्य:स्थिती
सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडवळ ते चंद्रमौळी, यावली ते देवडी फाटा, मोडनिंब ते टेंभूर्णी या परिसरात अक्षरश: खड्डेच खड्डे पडल्याची वस्तुस्थिती आहे. मोठमोठे खड्डे पडल्यानंतरही केवळ डांबर टाकून पॅच बुजवले आहेत. दुसरीकडे जड वाहने जाऊन महामार्गावरील एक बाजू खचल्याचेही चित्र आहे.
तालुकानिहाय अपघात व मृत्यू (जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत)
तालुका....अपघात...मृत्यू
मोहोळ........८८........६७
माढा........१४२........६८
माळशिरस........८९........६२
सांगोला........७५........५३
करमाळा........४४........२६
बार्शी........१०२........५१
मंगळवेढा........४३........२१
पंढरपूर........१३२........६५
अक्कलकोट........४३........२३
द.सोलापूर........५९........३६
उ.सोलापूर........६७........३५
सोलापूर शहर........१५२........५३
एकूण........१०५३........५७६