सोलापूर (Solapur) : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या क्षणापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी आदर्श आचारसंहितेचे पालन अत्यंत सतर्क राहून करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभाग प्रमुखाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. या वेळी सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, पोलिस उपायुक्त दीपाली काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने शासकीय इमारत, कार्यालय त्या ठिकाणी राजकीय व्यक्तींचे छायाचित्रे, नावे असतील तर ते तत्काळ झाकून ठेवण्याची कार्यवाही करावी अथवा काढून टाकावे. संपूर्ण जिल्ह्यात राजकीय व्यक्तींचे पोस्टर्स बॅनर्स व अन्य राजकीय मजकूर असेल, तर तोही काढून टाकावा व त्याचा अहवाल २४ तासांत जिल्हा प्रशासनाला सादर करावा. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी त्यांच्याकडे असलेली पदाधिकारी यांची वाहने तत्काळ निवडणूक प्रशासनाकडे जमा करावीत. आदर्श आचारसंहितेचे पालन अत्यंत काटेकोरपणे होईल याबाबत दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
ज्या कामांचे टेंडर प्रक्रिया झालेली आहे, परंतु कामे सुरू झालेली नाहीत, अशी कामे अजिबात सुरू करू नयेत. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आचार संहितेच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल प्रशासनाला त्वरित सादर करावा. आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे, अशी कोणाचीही तक्रार येण्यापूर्वी अत्यंत दक्ष राहून सर्व कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.