सोलापूर (Solapur) : मध्य रेल्वेतर्फे सणासुदीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेने लक्षणीय यश मिळवले आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबर या काळात दंड रूपाने एकूण १११.६२ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
मध्य रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबर या काळात विनातिकीट व अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तसेच बुक न केलेल्या सामानाच्या १९.९ लाख प्रकरणांमधून एकूण १११.६२ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. यामधून महसूल अनुपालन आणि सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यावर रेल्वेचे लक्ष प्रतिबिंबित होते.
सणासुदीच्या हंगामासाठी मध्य रेल्वे, रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार आरक्षित डब्यांमधील अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित केली आहे. १ ते १५ ऑक्टोबर या दरम्यान तिकीट तपासणी मोहीम झाली यानंतर ता. २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत सणासुदीच्या गर्दीत सुव्यवस्था राखणे आणि आरक्षित डब्यांमध्ये विनातिकीट किंवा अनधिकृत प्रवासाला प्रतिबंध करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
मोहिमेची वैशिष्ट्ये
- प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दी रोखण्यासाठी पुढाकार
- गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविली विशेष मोहीम
- मध्य रेल्वेने गर्दीच्या मार्गांवर तैनात केली विशेष तिकीट तपासणी पथके
- विनातिकीट आणि अनारक्षित प्रवाशांना आरक्षित डब्यांमध्ये चढण्यापासून रोखणार
- आरक्षण नसणाऱ्या प्रवाशांना सामान्य डब्यांकडे जाण्यासाठी करणार प्रवृत्त
प्रवासी व्यवस्थापन
ता. १४ जून ते. ३० सप्टेंबर या कालावधीत २ लाख ५४ हजार ७९५ अनारक्षित प्रवाशांना १२ हजार ९३० गाड्यांमधून उतरवण्यात आले किंवा त्यांना चढण्यापासून रोखण्यात आले. ज्यामुळे आरक्षित तिकिटांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि त्रासमुक्त झाला.
मध्य रेल्वे कठोर तिकीट तपासणी आणि विशेष मोहिमेद्वारे कार्यक्षम सेवा आणि प्रवाशांची सोय राखण्यासाठी वचनबद्ध आहे. अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी, सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि सर्व प्रवाशांचा प्रवास आनंददायी होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.