सोलापूर (Solapur) : होटगीरोड वरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानसेवेचा परवाना आवश्यक आहे. हा परवाना देण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने (डीजीसीए) होटगीरोड विमानतळाची पाहणी केली. या पाहणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर विमानसेवा परवान्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
होटगी रोड येथील विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणाली द्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे चार जणांचे पथक आले होते. हे पथक सोलापुरात येण्यापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळावरील कामकाजाची व सुरक्षा व्यवस्थेची पूर्व पाहणी केली. विमानतळाच्या पूर्ण होत असलेल्या कामकाजाची माहितीही त्यांनी घेतली.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सोलापुरातून विमानसेवा सुरू व्हावी अशी सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची इच्छा आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. सोलापुरातून ऑक्टोबरमध्ये विमानसेवा सुरू व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विमानसेवेचा परवाना मिळाल्यानंतर विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये विमान कंपनी निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होणार आहे.