सोलापूर (Solapur) : राज्य शासनाच्या ४३ विभागाअंतर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार जागांची मेगाभरती केली जाणार आहे. (Devendra Fadnaivs, Mega Bharati)
भरतीच्या प्रतिक्षेत हजारो तरुणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेगाभरतीचा कृती आराखडाच शासनाने तयार केल्याची माहिती सामान्य प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
राज्यात सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात (ऑगस्ट २०२२) शिंदे-फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. २० ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब, क आणि गट- ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला.
सध्या महसूल, कृषी, शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा (पाटबंधारे), महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन अशा महत्त्वपूर्ण विभागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही रिक्त पदे वाढली आहेत.
दरम्यान, कोरोनानंतर वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध उठवल्याने पदभरतीस सध्या कोणतीही अडचण राहिलेली नाही. दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, राजकीय सद्य:स्थिती, राज्यात वाढलेली बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मेगाभरती करावीच लागणार आहे. त्यादृष्टीने भरतीचा कृती आराखडा युद्धपातळीवर तयार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
ऑगस्टपूर्वीच ३२ हजार शिक्षकांची भरती
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल ६७ हजार पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमुळे गुणवत्तेवर परिणाम झाला असून पटसंख्याही कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर २०२२-२३ ची संचमान्यता अंतिम झाल्यावर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची ३० ते ३२ हजार पदे ऑगस्ट २०२३पूर्वी भरली जातील. पुढच्या वर्षी उर्वरित ५० टक्के पदभरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद स्तरावरच नोकर भरती
जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्वी जिल्हा परिषद पातळीवरच होत होती. पण, राज्य सरकारने तो निर्णय बदलून राज्यस्तरीय भरतीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्हा परिषदांचा पूर्वीचा कर्मचारी भरतीचा अधिकार संपुष्टात आला होता. परंतु, आता पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषद पातळीवरच कर्मचारी भरती होईल. सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकूण १८ हजार ९३९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मे अखेरीस ग्रामविकास विभागाकडून त्यासंबंधीचे आदेश निघतील.
उमेदवारांना पदभरती गाजरच ठरण्याची चिन्हे
राज्य सरकारमार्फत गेल्या दोन-तीन वर्षांपासून केवळ भरतीची घोषणा केली जात असून, आमच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचे मत या उमेदवारांनी व्यक्त केले. सरकारमार्फत नोव्हेंबर २०२२ मध्ये ४ हजार तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती. परंतु, ती जाहिरात अद्यापही आलेली नाही. त्याचसोबत जानेवारी महिन्यात वन विभागाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार होती. परंतु, मे महिना उजाडला तरीही जाहिरात आलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मेगाभरतीची घोषणा केली आहे. १५ ऑगस्टपूर्वी विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न असतील.
- सुधीर मुनगुंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य मंत्री
राज्यात गेल्या काही वर्षांपासून पासून अनेक वेळा सत्ता परिवर्तन झाले. परंतु, राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. भरतीचे केवळ गाजर दाखविण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. राज्य शासनाने लवकरात लवकर मेगाभरती घ्यावी.
- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती