Parking Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Satara: पार्किंगच्या प्रश्नावर पालिकेने काय काढला तोडगा?

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : सातारा शहरातील नागरिकांना भेडसावणारा वाहन पार्किंगच्या प्रश्‍नावर काहीअंशी तोडगा काढण्यासाठी पालिकेने एक पाऊल टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजपथावर पालिकेच्या माध्यमातून दोन हजार स्क्वेअर फूट जागेत दुचाकी पार्किंगसाठी जागा विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

शहरातील राजपथ आणि कर्मवीर भाऊराव पाटील पथ (खालचा रस्ता) या दोन प्रमुख रस्त्यांवर सातारकरांपुढे दिवसेंदिवस वाहन पार्किंगसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसून येते. दुसरीकडे वाहन चुकीच्या ठिकाणी अथवा डबल पार्क केल्याने वाहतूक शाखा कारवाई करते. नागरिकांवर होत असलेल्या दंडात्मक कारवाईमुळे त्यांचे दैनंदिन आर्थिक बजेट कोलमडत आहे.

शहरातील दोन्ही प्रमुख रस्त्यांवर पार्किंगची समस्या उद्‌भवू लागल्याने नागरिकांनी पालिका, पोलिस प्रशासन तसेच व्यावसायिकांना यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यास सातारा पालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पालिकेने राजपथावर दोन हजार स्क्वेअर फूट जागेत दुचाकी पार्किंगसाठी जागा विकसित करण्यासाठी टेंडर काढले आहे. त्यासाठी अंदाजित रक्कम २० लाख ३० हजार १०८ रुपये असल्याचे म्हटले आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमानी हौद परिसरात स्वच्छतागृह (शौचालय) उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

या स्वच्छतागृहाच्यावर पार्किंगसाठी सुमारे दोन हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध होत आहे. या ठिकाणी दुचाकी लावण्यासाठीच्या सुविधांचे बांधकाम करणार आहोत. दरम्यान, हे काम पूर्ण झाल्यावर येथे ७५ हून अधिक दुचाकी लावता येणे शक्य होणार आहे.