सातारा (Satara) : लोणी येथील टर्मिनल्स आणि डेपोंमध्ये इंधन चोरीचा प्रकार पुढे आला असून, अयोग्य टेंडर (Tender) पद्धतीमुळे हा प्रकार घडला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने येत्या १५ ऑक्टोबरपासून त्यांचे टॅंकर इंधन भरण्यासाठी टर्मिनलवर न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे या दरम्यान, सर्वसामान्य जनतेला इंधन टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्याची जबाबदारी तेल कंपन्यांची असून, त्यांनी तातडीने योग्य टेंडर काढून डेपोतून पेट्रोलपंप चालकांपर्यंत इंधनाचा पुरवठा करावा, अशी मागणी असोसिएशनने जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा जिल्हा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विपुल शहा, उपाध्यक्ष रितेश रावखंडे, प्रदीप सागावकर, नितीन कदम, खजिनदार प्रकाश पारेख, सचिव विवेक चव्हाण, रमेश हालगीकर, अभिजित दोशी, एस. बढिए यांच्या शिष्टमंडळाने आज पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले, की सातारा जिल्हा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन ही हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम या तीन कंपन्यांचे जिल्ह्यात पाचशे डीलर्सचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. या पेट्रोलियम कंपनीच्या लोणी येथील तेल डेपोमधून टॅंकरमधील इंधनाची चोरी होत असून, याबाबत पोलिसांनी कारवाई केलेली आहे. यामध्ये टेंडर घेणाऱ्यांकडूनच इंधनाची चोरीचा प्रकार होत असल्याने आता हा प्रकार बंद करण्यात आला आहे.
सध्या ७० टक्के टॅंकर हे पंप चालकांचे असून, ३० टक्के टॅंकर हे ट्रान्सपोर्टस्चे आहेत. कंपन्यांकडून योग्य पद्धतीने टेंडर काढण्याबाबत निर्णय होत नाही. तोपर्यंत येत्या १५ ऑक्टोबरपासून सातारा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन इंधन भरण्यासाठी टॅंकर्स पाठविणार नाहीत. याचा परिणाम जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा अनिश्चित काळापर्यंत भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना इंधन पुरविण्याची जबाबदारी कंपन्यांची राहणार आहे.
कमी दराच्या टेंडरमुळे जिल्ह्यात टॅंकरमधून इंधनाची चोरी होत असून, असोसिएशन हे सहन करणार नाही. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.