सातारा (Satara) : सातारा शहरातील अनेक रस्त्यांच्या लाव लिजाव पद्धतीने झालेल्या कामांची पहिल्याच पावसाने पोलखोल केली. पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावरील डांबरी थर, खडी वाहून गेल्याने नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. त्रासाबाबत नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारींची दखल घेत पालिकेने रस्त्याचे काम करणाऱ्या नऊ ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत.
काय झाले होते...
पावसाळापूर्व शहरातील अनेक रस्त्यांची कामे पालिकेने पूर्ण करण्याचा निर्णय घेत त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया राबवली होती. यानंतर अनेक ठेकेदारांनी रस्त्याची कामे केली. मात्र, कामे निकृष्ट झाल्याचे पहिल्याच पावसात उघड झाले. रस्त्यावरील डांबराचा थर वाहून गेल्याने पाऊस सुरू असताना दुचाकी घसरण्याचे तसेच पाऊस नसल्यावर वाहनांमुळे उडणाऱ्या फुफाट्यामुळे नागरिक, व्यापारी हैराण झाले होते.
तात्पुरत्या उपाययोजना
पावसाळ्यात रस्त्यांवरील डांबरी थर वाहून गेल्यामुळेच तसेच इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात खड्ढे पडले होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर पालिकेने नागरिक, वाहनचालकांची खड्ड्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात डागडुजीचा निर्णय घेत मुरमाचा मुलामा देत खड्डे बुजविले.
या ठेकेदारांना बजावल्या नोटिसा
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांमध्ये असणाऱ्या असंतोषाला वाट करून देत ‘सकाळ’ने त्याबाबतची ठोस भूमिका घेतली होती. या भूमिकेमुळे पालिकेने या ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा बजावलेल्यांमध्ये रजिया कन्स्ट्रक्शन, ए. एस. कन्स्ट्रक्शन, डॉली एंटरप्रायजेस, उमराणी कन्स्ट्रक्शन, युनिटी बिल्डर्स, एस. ए. एंटप्रायजेस, आर. बी. कन्स्ट्रक्शन आदींचा समावेश आहे. नोटिसा बजावण्यापूर्वी पालिकेने ठेकेदारांसमवेत बैठक घेत त्यांना निविदेतील अटीनियमांचे पालन करण्याचे आदेश दिले.
अशा होत्या अटी..
एखादे विकासकाम केल्यानंतर देखभाल, दुरुस्ती व इतर तांत्रिक बाबींची जबाबदारी काही काळासाठी ठेकेदाराची असते. अशी अट निविदा प्रक्रियेतच समाविष्ट असते. यानुसार निविदेतील अटी शर्तींनुसार खराब रस्त्यांची तातडीने प्राथमिक दुरुस्ती तसेच पावसाने पूर्ण उघडीप दिल्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची देखील सक्त ताकीद ठेकेदारांना करण्यात आली आहे.