सातारा (Satara) : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून, त्यासाठीचा ठेका मुंबईस्थित एका संस्थेस देण्यात आला आहे. या संस्थेला प्रत्येक कुत्र्यावरील निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व त्या पश्चात करावयाच्या देखभालीपोटी १ हजार रुपये देण्यात येणार असून, संपुर्ण प्रक्रियेसाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.
सातारा शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोमधील दूषित खाद्य खाल्ल्याने कुत्र्यांचे संतुलन बिघडले होते. या कुत्र्यांनी चावा घेतल्याने सोनगाव कचरा डेपो परिसरातील डबेवाडी, जकातवाडी येथील ग्रामस्थ जखमी झाले होते. यापैकी एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी साताऱ्यातील नागरिक करू लागले. यासाठीची प्रक्रिया सातारा पालिकेकडून सुरू झाल्यानंतर कोरोना व लॉकडाउनमुळे ती प्रक्रिया रखडली.
अनलॉकची प्रक्रिया सरकारने जाहीर केल्यानंतर पालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली. गल्लीबोळात असणारी भटकी कुत्री पकडून त्यावर निर्बिजीकरण करणाऱ्या अनुभवी संस्थांकडून यासाठीची टेंडर पालिकेकडून मागविण्यात आली. या प्रक्रियेत पहिल्यांदा काही संस्थांनी सहभाग नोंदवला, मात्र नंतर ती टेंडर प्रक्रिया तांत्रिकतेच्या मुद्यावर पालिकेस रद्द करावी लागली.
यानंतर पालिकेने यासाठीची फेरटेंडर प्रक्रिया राबवली. यात तीन संस्थांनी सहभाग नोंदवला. याप्रक्रियेत सर्वाधिक कमी म्हणजे १ हजार रुपये दराने कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, त्यापश्चात देखभाल, उपचार करण्यासाठी मुंबईस्थित कंपनीने स्वारस्स दाखवले. यामुळे त्या संस्थेस साताऱ्यातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण प्रक्रिया करण्याची जबाबदारी पालिकेने सोपवली. यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पार पडली असून पहिल्या टप्प्यात यासाठीचे काम संबधित संस्थेच्या वतीने येत्या काही दिवसांत सुरु होणार आहे. पालिकेकडे शहर आणि परिसरात अडीच हजार भटकी कुत्री असल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. यामुळे या प्रक्रियेसाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
निर्बीजीकरण व इतर प्रक्रियेसाठीची यंत्रणा संबंधित संस्था उभारत असून यासाठी स्थानिक पातळीवरील पशुवैद्यकांची मदत घेण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना पालिकेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे म्हणाले, नागरिकांना सुरक्षित वातावरणात शहरात फिरता यावे, यासाठी पालिकेने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर पूर्ण करण्यात येणार असून, या प्रक्रियेवर पालिकेचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे.