सातारा (Satara) : मराठ्यांच्या इतिहासातील शिवरायांच्या पराक्रमाचे ज्वलंत प्रतीक असलेल्या प्रतापगड किल्ला जतन व संवर्धनासाठी १२७ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण समितीच्या अध्यक्षपदी खासदार उदयनराजे भोसले आहेत. या समितीचे सदस्य सचिव म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यरत राहतील. या समितीच्या सदस्यपदी स्थानिक विधानसभा सदस्य आमदार मकरंद पाटील, विभागीय आयुक्त (पुणे विभाग), पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कार्यालयाचे प्रादेशिक संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबईचे संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून नितीन शिंदे, मिलिंद एकबोटे, शरद पोंक्षे, सदाशिव टेटविलकर, सोमनाथ (काका) धुमाळ, चंद्रकांत पाटील, पंकज चव्हाण, अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण अंतर्गत विविध कामांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प नियोजन, मूल्यमापन संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय पुरातत्त्व विभागातील निवृत्त तज्ज्ञ, पुरातत्त्वशास्त्र, बांधकाम वारसा, मध्ययुगीन इतिहास यामधील तज्ज्ञ अधिकारी हे सल्लागार सदस्य, तसेच विविध कामांसाठी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मराठा लष्करी वास्तू स्थापत्याचे उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी केंद्र शासनाने युनेस्कोला प्रस्ताव पाठविला आहे. प्रतापगड किल्ल्याचा या नामांकनाच्या प्रस्तावामध्ये समावेश आहे.
प्राधिकरणाचे अपेक्षित कार्य असे
- प्राधिकरणाने दर महिन्याला बैठक घ्यावी
- प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार संबंधित अधिकारी किंवा तज्ज्ञांना बैठकीस निमंत्रित करावे
- कामांच्या प्रगतीचे संनियंत्रण करणे
- प्रकल्पांतर्गत निर्माण केलेले विविध घटक कार्यान्वित करणे
निधी प्राधिकरणाला वर्ग होणार
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटन स्थळे विकासाचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत ३८१.५६ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य विभाग या एकत्रित आराखड्यातील केवळ प्रतापगड किल्ला जतन व संवर्धनाचा विषय प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणामार्फत हाताळणार आहे. प्रतापगड किल्ला जतन व संवर्धनासाठी मंजूर असलेला १२७ कोटी १५ लाख रुपयांचा निधी प्राधिकरणाला वर्ग करावा, असे शासनाने सूचित केले आहे.