Mahabaleshwar Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्‍‍वरच्‍या सुशोभीकरणाचा ठेका रद्द; नव्‍याने टेंडर काढणार

टेंडरनामा ब्युरो

महाबळेश्‍वर (Mahabaleshwar) : येथील बाजारपेठेच्या १०० कोटींच्या सुशोभीकरणासाठी नेमलेले वास्तुविशारद पंकज जोशी व ठेकेदार राम सवानी यांचा ठेका रद्द करून नव्याने टेंडर काढण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाचे शहरातून नागरिकांनी स्वागत केले.

गेल्या दोन वर्षांपासून महाबळेश्वरच्या बाजारपेठेच्‍या महत्त्वाकांक्षी सुशोभीकरणाबाबत विविध कारणांसाठी वाद सुरू होता. निकृष्ट बांधकाम, दर्जाहीन काँक्रिटचे काम व नियोजनशून्य कारभार शहरात गेल्या वर्षापासून सुरू होता. याबाबत शहरातून व्यापाऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी करून देखील ठेकेदार व वास्तुविशारद यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता, तसेच कामात देखील कोणतीही सुधारणा होत नव्हती. वास्तुविशारद पंकज जोशी यांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत कोणतीही बैठक न घेता सुशोभीकरणामध्ये बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मालकी असलेल्या मिळकतींचा समावेश केला होता. यामुळे शहरातील काही व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद होणार होते. यासाठी व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शहरातील नागरिकांच्या भावना ऐकून घेऊन चार फूट वगळून गटारापासून सुशोभीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. त्यामुळे शहरातून या निर्णयाचे स्वागत झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शहरातील नागरिकांना बोलावून काम सुरू करून ते मेच्या उन्हाळी हंगामाअगोदर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु वास्तुविशारद पंकज जोशी व ठेकेदार राम सवानी यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे बाजारपेठेतील सुशोभीकरणाचे वीस टक्के काम देखील त्यांना पूर्ण करता आले नाही, तसेच केलेल्या कामाबाबत शहरातील व्यापाऱ्यांसह पर्यटकांनी देखील दर्जाबाबत व नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

नुकताच पावसाळा संपल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महाबळेश्वर बाजारपेठेचे काम दिवाळी हंगामापूर्वी लवकरात लवकर सुरू करून संपविण्याचा निर्धार होता. याबाबत माहिती मिळताच शहरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार मकरंद पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. या बैठकीवेळी सर्व व्यापाऱ्यांच्या सह्या घेऊन अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल, माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, संदीप साळुंखे, ॲड. संजय जंगम, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, किसन शिंदे, माजी उपनगराध्यक्ष अफझलभाई सुतार, सुनील साळुंखे, राजेश कुंभारदरे, सतीश ओंबळे यांच्या शिष्टमंडळाने आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली.

भावनांचा आदर

यावेळी शहरातील सुशोभीकरणासंदर्भात चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी डुडी यांनी वास्तुविशारद पंकज जोशी व ठेकेदार राम सवानी यांच्‍या कामाचा दर्जा व नागरिकांच्या भावनांचा आदर राखत त्यांचे काम बंद करून नव्याने स्पर्धा घेण्‍याचे जाहीर केले, तसेच त्‍यानुसार डिझाईन फायनल करून बाजारपेठेचे काम योग्य पद्धतीने करून घेण्यासाठी नियोजन करत असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.