Sangli Municipal Corporation

 

Tendernama

पश्चिम महाराष्ट्र

सांगली महापालिकेत टेंडर मॅनेजचा घोटाळा; 'सायबर'कडे तक्रार

टेंडरनामा ब्युरो

सांगली : महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या दहा लाखांच्या आतील कामांचे टेंडर मॅनेज करण्याचा घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप नागरिक जागृती मंचाच्यावतीने शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे करण्यात आली आहे. मंचचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी गेल्या वर्षभरातील अनेक निविदांचे पुरावे शोधून पोलिसांकडे देणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, 'महानगरपालिकेत वेगवेगळ्या कामांचे पूर्वी तीन लाखाच्या आतील कामे आणि आता नवीन शासन निर्णय दहा लाखाच्या आतील कामे मनपा संकेतस्थळावर दोन लिफाफा पद्धतीने काढली जातात. ही पध्दत संशयास्पद असल्याच्या तक्रारी आम्ही वारंवार आयुक्तांसह सिस्टीम मॅनेज नकुल जकाते यांच्याकडे वेळोवेळी केल्या आहेत. तक्रारीनंतर काही दिवस टेंडर प्रक्रिया सुरळीत होते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी घोटाळ्याची पद्धत आहे. सिस्टीम मॅनेजर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी टेंडर नोटीसी संकेतस्थळावर टाकण्याचे सर्वाधिकार त्या त्या विभागप्रमुखांकडे दिले. त्यानंतर घोटाळ्यांना ऊत आला आहे. कोणाचा कोणाला धरबंद नाही.

संकेतस्थळावर टेंडर दिसले पाहिजे याची जबाबदारी विभागप्रमुखांवर आहे. मात्र, टेंडर क्लार्ककडून घोटाळे होत असल्याचे दिसून आले आहे. आम्ही अशा अनेक टेंडरचे पुरावेच शोधले आहेत. याबाबत रितसर पोलिसांकडे तक्रार केली असून आता त्यांच्याकडून चौकशीसाठी बोलावणे आले की आम्ही पुरावे सादर करु.’’ ते म्हणाले,‘‘ गेल्या चार ते पाच वर्षा पासून हा प्रकार सुरु आहे. टेंडर फॉर्म घेण्याची अंतिम तारीख व वेळ संपल्यावर संकेतस्थळावर टेंडर नोटीस दिसू लागते. हा प्रकार काही ठेकेदारांच्या संगनमताने होत आहे. आम्ही अनेकांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकाराला कायमस्वरुपी आळा घालण्यासाठी टेंडर महा ई संकेतस्थळावंर टाकले जावे. आम्ही यापुर्वीही पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. बांधकाम विभाग ,मुख्यलय, चारही प्रभाग समित्यांच्याच्या बाबतीत हेच अनुभव आहेत. गेल्या चार पाच वर्षात किमान किमान २५ ते ३० कोटीच्या निविदा मॅनेज झाल्या आहेत. त्याची सायबर सेल मार्फत तपासणी केली तर सारे काही उघड होईल.’’

‘‘आम्ही यापूर्वी प्राप्त झालेल्या अशा तक्रारींची दखल घेतली आहे. त्यात तथ्य आढळलेले नाही. त्याचे काही पुरावे असतील तर पुन्हा चौकशी करता येईल.’’

- संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका