Irrigation Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : सांगलीतील 'त्या' महत्त्वाच्या प्रकल्पासाठी 1 हजार कोटींचे टेंडर; लवकरच...

टेंडरनामा ब्युरो

सांगली (Sangli) : ‘विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे. दर्जाबाबत कुठेही तडजोड होता कामा नये. निधीची तुम्ही चिंता करू नका, निधी पुरेसा आणि वेळेवर मिळेल. तो कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दिली.

जत तालुक्यातील ६५ गावांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या म्हैसाळ विस्तारित प्रकल्पाच्या कामाची कपूर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची सध्याची गती आणि गुणवत्ता चांगली असल्याचे कौतुक त्यांनी केली. क्षेत्रीय दौऱ्यात म्हैसाळ येथील पंपगृह, बॅरेज, विस्तारित योजनेचा बेडग येथील टप्पा क्रमांक-१, ऊर्ध्वगामी नलिका, बेळंकी येथील जोड प्रवाही नलिका, तसेच बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्याबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. विस्तारित योजनेच्या सुरू असलेल्या सर्व कामांचा आढावा घेतला.

वारणाली विश्रामगृहात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत सर्व सिंचन व बांधकामाधीन प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये कपूर यांनी प्रकल्पांची सद्यःस्थिती, अडचणी व आवश्यक निधी आदींची माहिती घेतली. सर्व प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता धुमाळ व चोपडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

म्हैसाळ जत विस्तारित योजनेची एकाच वर्षामध्ये ५० टक्के शीर्ष कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी एकूण ४५० कोटी खर्च करण्यात आले आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास जत तालुक्यात ६५ गावांना सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार आहे. पुढील टप्प्यातील कामासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. ती प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून, त्याचा कार्यारंभ आदेश लवकरच निघेल, असे सांगण्यात आले.

गुणवत्ता महत्त्वाची

अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सिंचन योजनांचे काम वेळेत पूर्ण करताना गुणवत्तेत कोणतीही तडजोड करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यासाठी आठवड्याला गुणवत्ता पाहणी करा. त्यासाठी आवश्यकतेनुसार क्वालिटी कंट्रोल कार्यालयांची संख्या वाढवा, असे त्यांनी सांगितले.