कऱ्हाड (Karhad) : पाटण (Patan) तालुक्यातील ढेबेवाडी आणि मोरगिरी खोऱ्याला जोडून तालुक्याच्या ठिकाणी कमी अंतरात येता यावे, यासाठी महिंद येथील मठवाडीच्या गडगडा कड्यातुन वाल्मीक पठारावर येणारा रस्ता होत आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीची लेखी हमी दिली. 28 एप्रिल 2021ला कामाचे ई-टेंडर प्रसिद्ध झाले. 22 मे 2021 रोजी बांधकाम विभागाने वर्क ऑर्डरही दिली. परंतु आज आठ महिने झाले तरी रस्त्याच्या कामातील साधा एक दगडही हाललेला नाही. त्यामुळे मठवाडी-वाल्मिक पठार रस्त्याची वाट बिकटच असून त्यामुळे ग्रामस्थांत मोठा रोष निर्माण झाला आहे.
ढेबेवाडी खोऱ्यातील महिंद गावच्या मठवाडीवरुन संबंधित रस्ता गडगडा डोंगर परिसरातुन कळकेवाडी कुसरुंड मार्गे पाटण असा होणार आहे. ढेबेवाडी विभागाचा पश्चिम भाग मोरणा विभागाला जोडून पाटण या तालुक्याच्या मुख्य ठिकाणी यायला या विभागातील जनतेचा वेळ व पैसा वाचणार आहे. गेली अनेक वर्षे महिंद येथील सामाजिक कार्यकर्ते अधिकराव साळुंखे त्या रस्त्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबुन लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याला 2019 मध्ये यश आले.
पावसाळी अधिवेशनात त्यासाठी तीन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र त्याच वर्षी कोरोना महामारीचे संकट आले आणि सरकारने तो निधी माघारी घेतला. पुन्हा 2021 मध्ये रस्ता मंजुर करण्यात आला. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीची लेखी हमी दिली. 28 एप्रिल 2021 रोजी ई टेंडर प्रसिद्ध झाले. कामाचे टेंडर देण्यात आले. 22 मे 2021 रोजी बांधकाम विभागाने वर्क ऑर्डरही दिली.
परंतु आज आठ महिने झाले तरी रस्त्याच्या कामातील साधा एक दगडही हाललेला नाही. या रस्त्यासाठी अधिकराव साळुंखे यांनी 2018 पुर्वी सलग तीन ते चार वर्षे पाटण तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यांच्या उपोषणामुळे लोकप्रतिनिधींनी दखल घेवुन त्या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. साधारण चार किलोमीटर रस्ता झाला तर ढेबेवाडी विभागातील महिंद, सळवे, सणबुर, रुवले, बनपुरी, जानुगडेवाडी, या परिसरातील वाड्यावस्त्यातील जनता पाटणशी मोरणा विभागामार्गे जोडली जाणार आहे. सध्या पाटणला येण्यासाठी नवारस्ता-ढेबेवाडी घाटमार्गे फिरुन यावे लागते. नवीन रस्त्यामुळे त्यांचे अंतर कमी होऊन वेळ व पैसाही वाचणार आहे. त्याचबरोबर मोरणा विभागातील जनता या मार्गे ढेबेवाडीला कमी कालावधीत जाऊ शकणार आहे. रस्त्यासाठी टेंडर होऊनही बांधकाम विभाग या रस्त्याचे काम का सुरु करीत नाही, याबाबत ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.