अहमदनगर (Ahmednagar) : अहमदनगर शहर व उपनगरात १२ फुटांपेक्षा अधिक उंचीचे पाच हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने प्रथमच तब्बल एक कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. मात्र, एक कोटी देऊनही ठेकेदार ही झाडे लावण्यास तयार नाहीत. त्यामुळे या कामासाठी महापालिकेने फेरटेंडर मागविले आहे. (Ahmednagar Municipal Corporation)
सुमारे पाच लाख लोकसंख्येच्या नगर शहराला नऊ लाख वृक्षांची गरज आहे. असे असतानाही महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी वृक्षलागवडीने दुर्लक्ष केले. यंदा मात्र शहरात पाच हजार मोठे वृक्ष लावण्याचा निश्चय महापालिकेने केला आहे. या वृक्षलागवडीसाठी पाच महिन्यांपूर्वी टेंडर मागवण्यात आले. पुणे येथील जेट सर्व्हिसेस, वळसे पाटील एन्टरप्राईजेस, न्यू भारती ॲग्रो केमिकल, अनिकेत ॲग्रो या चार ठेकेदार संस्थांनी हे टेंडर भरलो. टेंडर प्रक्रियेची कार्यवाही लांबल्याने, तसेच दरम्यानच्या कालावधीत साहित्याच्या दरात वाढ झाल्याचे कारण पुढे करत या संस्थांनी टेंडर दरात काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता महापालिकेने फेर टेंडर मागवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यान विभागाने तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच यावर निर्णय होणार आहे.
टेंडर रक्कम (कोटीत) - १
आलेले टेंडर - ४
नियोजित वृक्षलागवड - ५०००
एका प्रभाग समितीत वृक्ष - १२५०
असे होणार वृक्षसंवर्धन
वृक्षलागवडीसाठी जेट सर्व्हिसेस या संस्थेने एक कोटी १३ लाखांचे टेंडर भरले. मात्र, महापालिकेने कमी रक्कम भरलेल्या ठेकेदार संस्थेला काम देवू केले. मात्र, लावलेल्या वृक्षांच्या संगोपणाचा खर्च मोठा असल्याने ठेकेदार संस्थेने नकार दिला. १२ फूट उंचीचे वृक्ष, ट्री गार्ड, खड्डे, माती, खत, पाणी हा सर्व खर्च संबंधित ठेकेदार संस्थेला दोन वर्षांपर्यंत करावा लागणार आहे. योग्य संगोपण न झाल्यात ठेकेदार संस्था जबाबदार असेल.
वृक्ष करातून निधीचा प्रश्न सुटलेला आहे. यावर्षी शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. लावलेल्या वृक्षांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी ठेकेदार संस्था नेमण्यात येणार आहे. फेरटेंडरची कार्यवाही लवकरच होईल. १२ फूट उंचीचे वृक्ष लावण्यात येणार असून, प्रत्येक वृक्षाचे योग्य पद्धतीने संवर्धन करण्यात येईल.
- यशवंत डांगे, उपायुक्त, अहमदनगर महापालिका