माळेगाव (Malegaon) : माळेगाव कारखानाच्या महत्वाकांक्षी इथेनॉल प्रकल्प उभारणीचे सुमारे दीडशे कोटी रकमेचे टेंडर (Tender) अखेर रविवारी (ता. २९ सप्टेंबर) कायमचे रद्द झाले.
आगामी काळात अनुभवी व तज्ज्ञ सभासद, ज्येष्ठ संचालक तसेच केंद्रीय नॅशनल फेडरेशनच्या अधिकाऱ्यांसह व्हीएसआय संस्थेच्या सल्ल्याने विस्तारित इथेनॉल प्रकल्पाबाबत विचार केला जाईल. अर्थात या प्रकल्पासाठी स्वतंत्र वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवून सभासदांच्या मान्यतेनेच पुढील योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वास माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी व्यक्त केला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.३०) आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमिवर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष अॅड.केशवराव जगताप यांनी माहिती स्पष्ट केली. यावेळी उपाध्यक्ष तानाजी देवकाते, संचालक मदनराव देवकाते, अनिल तावरे, नितीन सातव, भीमराव आटोळे, निशिगंध निकम, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, माळेगाव कारखाना प्रशासनाकडून सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या विस्तारित इथेनॉल प्रकल्पाला याआगोदर स्थगिती दिली होती. त्यासंबंधीच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सत्ताधारी संचालक मंडळाने इथेनॉल प्रकल्प उभारणीचे टेंडर अखेर कायमचे रद्द केले.
अध्यक्ष जगताप म्हणाले, पुढील काही दिवसांत एफआरपीच्या तुलनेत साखरेची किंमत केंद्र सरकार वाढविण्याच्या मानसिकतेत आहे. तसे स्पष्ट संकेत शासनस्तरावर पुढे आले आहेत. या प्रक्रियेत मात्र केंद्राने इथेनॉलचे धोरण अस्पष्ट ठेवलेले आहे. त्यामुळे साखरेचे दर प्रतिक्विंटल पुढे वाढले, तर इथेनॉल निर्मिती कितपत परवडणार याचाही अभ्यास करण्याची गरज आहे.
नीराकाठच्या पट्ट्यात दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर
माळेगावच्या नीरा नदी काठच्या पट्ट्यातील सभासदांचा दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. माळेगावचे सांडपाण्याचा शंभर टक्के बंदोबस्त केल्याखेरीज नव्याने इथेनॉल प्रकल्प करू नका, अशी मागणी सभासदांची आहे. या सर्व वातावरणाचा विचार करून संचालक मंडळाने इथेनॉल प्रकल्प उभारणीचे सुमारे दीडशे कोटी रकमेचे टेंडर कायमचे रद्द केले.