Devendra Fadnavis, Pruthviraj Chavan Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Pruthviraj Chavan : 'तो' जीआर काढताना देवेंद्र फडणवीस झोपेत होते काय?

टेंडरनामा ब्युरो

कऱ्हाड (Karad) : ज्या अध्‍यादेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आम्हाला विचारत आहेत, त्यांनी सप्टेंबर २०२३ ला जो कंत्राटी भरतीचा अध्‍यादेश काढला, तेव्हा ते काय गुंगीत होते का? जनतेचा रेटा सुरू झाल्यानंतर घाईगडबडीत तुम्ही तुमचाच अध्‍यादेश रद्द केला. अध्‍यादेश रद्द करायचा होता, तर तो काढलाच कशाला? असा उलट सवाल आमदार पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केला आहे.

माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या काळात १४ जानेवारी २०११ मध्येही कंत्राटी भरतीचा अध्‍यादेश काढल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. त्यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, नांदेडसह इतर ठिकाणी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी आज येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. या वेळी त्यांनी रिक्त असलेली डॉक्टरांची संख्या, रुग्णालयात असणाऱ्या इतर सुविधा व समस्या यांचा प्रभारी वैद्यकीय अधीक्षक राजेश शेडगे यांच्याकडून आढावा घेतला.

यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘शासनाने आरोग्य विभागाची पदे भरण्यामध्ये गलथानपणा केला आहे. शासनाकडून पैसे वाचविण्याचा प्रयत्न चालला आहे. सगळे कंत्राटीकरण चालले आहे. जोपर्यंत पूर्णवेळ, जबाबदार डॉक्टरांची नेमणूक होत नाही तोपर्यंत काम व्यवस्थित होणार नाही. आरोग्य यंत्रणेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष शासनाचे झाले आहे. विधानसभेत त्यावर आवाज उठवावा लागणार आहे.’’

५० बेडचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय असून, सध्या १३८ बेडद्वारे रुग्णावर उपचार सुरू आहेत. अजून ५० बेड मंजुरीसाठी आवश्यकता आहे. त्यानुसार त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवा, अशा सूचना आमदार चव्हाण यांनी वैद्यकीय अधीक्षकांना केल्या.