Satara

 

Tendernama

पश्चिम महाराष्ट्र

सातारा मेडिकल कॉलेज : टेंडर प्रक्रियेत कोणते नेते शर्यतीत?

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : सातारा शासकिय मेडिकल कॉलेजच्या (Government Medical College) प्रवेशाची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरु होत असून, मार्चमध्ये कॉलेज प्रत्यक्ष सुरु होणार आहे. त्यासाठी वर्ग चारच्या पदांची टेंडर पद्धतीने भरती केली जाणार आहे. बाह्यस्थ संस्थेच्या माध्यमातून ही भरती होणार असून यामध्ये सफाई कामगार, लॅब टेक्निशियन यासह पाच ते सहा प्रकारची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेत कोणत्या नेत्यांच्या कंपन्या सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या सर्व प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यामुळे एकीकडे मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया तर दुसरीकडे इमारत बांधकाम व वर्ग चारच्या पदांसाठीची टेंडर प्रक्रिया होणार आहे. यातील प्रवेशाची प्रक्रिया वैद्यकिय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ऑनलाइन पध्दतीने होणार आहे.

टेंडरची प्रक्रिया ही बांधकाम आणि वैद्यकिय शिक्षण विभागाकडून होणार आहे. एक फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होत असल्याने कॉलेज सुरु करताना लागणारे मनुष्यबळाची भरती ही टेंडर पद्धतीने होणार आहे. सातारा वैद्यकिय महाविद्यालयाच्या सर्व प्रक्रियेतकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

वर्ग चारच्या पदांच्या भरतीसाठी आगामी आठवड्यात टेंडर काढले जाणार आहे. यातून पाच ते सहा प्रकारची विविध पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती टेंडरव्दारे बाहस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे.यामध्ये सफाईकामगार, टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, एक्स रे मशिन ऑपरेटर आदी पाच ते सहा पदांचा समावेश आहे. त्यामुळे या पदांच्या भरतीसाठी विविध संस्थांकडून टेंडर मागवले जाणार आहे. हे टेंडर आठवडाभरात पूर्ण करुन तातडीने वर्ग चारचे कर्मचारी भरले जाणार आहेत. त्यामुळे सातारा मेडिकल कॉलेज सुरु होण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. आता वर्ग चारचे कर्मचारी पुरवण्यासाठी होणाऱ्या टेंडरमध्ये कोणत्या नेत्यांच्या कंपन्या सहभागी होणार याची उत्सुकता आहे.