Sand Mining Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : ऑनलाइन वाळूचा प्रश्न मार्गी; वाई डेपोत 23 हजार ब्रास साठा

एका व्यक्तीला महिन्याला दहा ब्रासच वाळू

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : जिल्ह्यात ऑनलाइन वाळू उपलब्ध झाली असून, वाई तालुक्यातील आसले, एकसर, पाचवड व वाई येथे चार डेपो करण्यात आले आहेत. या डेपोंवर २३ हजार ब्रास वाळू उपलब्ध करण्यात आली आहे. ही वाळू एका व्यक्तीला एका महिन्यात किमान दहा ब्रासच मिळणार आहे. त्यामुळे जास्त वाळूची आवश्यकता असेल, तर महिन्यानंतर पुन्हा वाळूची मागणी करावी लागणार आहे, तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी महाखनिज प्रणालीवर असणे बंधनकारक आहे. वाहनांना जीपीएस यंत्रणाही बसवावी लागणार आहे.

नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करण्यासाठी व अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण आखले आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्यात ऑनलाइन वाळू उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. वाई तालुक्यात वाळूचा डेपो निश्चित करण्यात आला आहे. आसले, एकसर, पाचवड व वाई येथे हे डेपो असून, येथे २३ हजार ब्रास वाळू उपलब्ध करण्यात आली आहे.

या डेपोतून ऑनलाइन वाळू खरेदी करताना सर्वसामान्य जनतेला सहाशे रुपये प्रतिब्रास दराने ही वाळू मिळणार आहे. या वाळूची संबंधिताने स्वत: वाहतूक करायची आहे. ज्यांना बांधकामासाठी वाळू आवश्यक आहे, अशांनी याची शासनाच्या www.mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागणीची नोंद करायची आहे. नोंदणी केल्यानंतर १५ दिवसांत वाळू डेपोतून वाळू उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी रेशनकार्ड, आधार कार्ड, घरकूल प्रमाणपत्र, बांधकाम परवाना आदी कागदपत्रे मोबाईल क्रमांकासह उपलब्ध करणे बंधनकारक आहेत. सर्वांना वाळू सहाशे रुपये प्रतिबासप्रमाणे दहा ब्रासच मिळणार आहे. यापेक्षा जास्त वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्यानंतर त्या तारखेच्या बरोबर एक महिन्यानंतर पुन्हा वाळूची मागणी करावी लागणार आहे. वाहतुकीचा खर्च नोंदणी करणाऱ्यालाच करावा लागेल. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी महाखनिज प्रणालीवर करणे आवश्यक आहे, तसेच वाहनांना जीपीएस यंत्रणा देखील आवश्यक आहे.

कऱ्हाड, पाटणला ही होणार उपलब्ध

पूरपरिस्थितीच्या कारणास्तव कऱ्हाडला चार व पाटणला एक वाळू डेपोसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ती पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वाळू उपलब्ध होणार आहे. कऱ्हाडला १६ हजार ब्रास, तर पाटणला ३४ हजार ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे.