कोल्हापूर (Kolhapur) : अखेर गाव चावड्यांच्या इमारतींच्या बांधकामाचे टेंडर (Tender) निघाले असून, जिल्ह्यातील तलाठ्यांनाच बसायला हक्काची चांगली जागा नाही तर लॅपटॉप घेवून काय करू, प्रिंट कोठे काढू अशी ओरड एकेकाळी होत होती. काही ठिकाणी इमारतींना गळती होती, म्हणून तलाठी तेथे थांबायला तयार नव्हते तर काही ठिकाणी ग्राम पंचायतीची (Gram Panchayat) इमारतच त्यांचे हक्काचे कार्यालय होते. मात्र आता राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील तलाठ्यांसाठी हक्काची चावडी मिळणार आहे.
राधानगरी तालुक्यातील अकरा ठिकाणांच्या चावड्यांच्या इमारतींच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर प्रसिद्ध केले आहे. वर्षभरात हे काम पूर्ण करण्याची अट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी तलाठ्यांसाठी स्वतंत्र इमारती नव्हत्या. काही ठिकाणी जागाच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना इमारत उभा करणेही शक्य नव्हते. मात्र आता राधानगरी तालुक्यात सोन्याची शिरोली, धामोड, चंद्र (अर्जुनवाडा), लिंगाचीवाडी, कसबा तारळे, राशिवडे, शिरसे, फेजवडे, गुडाळ, शिप्पूर तर्फे नेसरी आणि हडलगे येथील चावड्यांना नवीन इमारत मिळणार आहे. त्यासाठी तेरा ते तेविस लाखांपर्यतची अंदाजित रक्कम आहे.
पंधरा नोव्हेंबरपर्यंत टेंडर इसारा रक्कम, प्रतिज्ञा पत्रासह इतर कागदपत्रे जमा करावयाची असून शक्य झाल्यास त्याच दिवशी त्या उघडण्यात येणार असल्याचे टेंडरमध्ये म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंत्यांकडून हे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. वर्षभरात या इमारती अपडेट होणार आहेत. काही ठिकाणी मुळ इमारतींना गळती लागल्यामुळे सुद्धा नवीन इमारती उभारण्याचे काम स्थानिक आमदारांच्या पुढाकारातून होत आहे. एकंदरीतच तलाठ्यांसाठी गावचावडीची इमारत वर्षात चकाचक होणार आहे.