Nagar ZP Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar ZP : महत्त्वाच्या विभागाची इमारत 'पाण्या'त; नगर झेडपी म्हणते दुरुस्तीला पैसेच नाहीत!

टेंडरनामा ब्युरो

अहमदनगर (Ahmednagar) : जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राचा कारभाराचा गाडा ज्या इमारतीतून हाकला जातो, त्या माध्यमिक शिक्षण विभागाची इमारतच 'पाण्या'त आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिला गळती लागलेली असताना झेडपीच्या बांधकाम विभागाची त्याकडे डोकेझाक सुरू आहे. सध्या त्या इमारतीतील संगणक आणि कागदपत्र प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवण्याची नामुष्की आलीय.

जिल्हा शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी विविध आघाड्यांवर चमकत आहेत. प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल ११ हजार शिक्षक कार्यरत आहेत. माध्यमिक विभागाकडेही तेवढीच शिक्षक संख्या आहे. प्राथमिक शिक्षण विभाग नव्या इमारतीत आहे, तर माध्यमिक शिक्षक विभागासाठी जुनी इमारत बहाल करण्यात आली आहे. तेथे शिक्षकांचे सर्व दप्तर आहे. ते पावसाच्या पाण्यात भिजत आहे. फायलींचे गठ्ठे दुसरीकडे हलविले आहेत, काहींवर कागद पांघरून थातूरमातूर उपाययोजना केलीय. संगणकांवरही प्लॅस्टिक कागद आहेत.

दुसऱ्या मजल्यावरील छतही धोकादायक बनले आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागते. त्याविषयी या विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वस्तुस्थिती मांडली. परंतु त्यात अद्यापि काहीच बदल झालेला नाही.

सीईओ आशिष येरेकर यांनी याबाबत बांधकाम विभागाला कार्यवाही करण्यास सांगितले. परंतु त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांना वेळच नाही. आपल्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते सुरक्षित वास्तू देऊ शकत नसतील, तर शाळा आणि इतर सरकारी वास्तूंविषयी ते किती उदासीन असतील, यावरून कल्पना. जिल्हा परिषदेच्या दक्षिण बांधकाम विभागाकडे ही इमारत येते. एखादे टेंडर द्यायचे झाल्यास बांधकाम विभाग कार्यतत्पर असतो. मात्र, या कामाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही.

दुसरा गमतीचा भाग असा की, जिल्हा परिषदेचे कर्मचारी वसाहत तब्बल आठवडाभर अंधारात होती. महावितरणचे वीजबिल न भरल्याने त्यांच्यावर ही वेळ आली होती. दोन विभागांतील समन्वयाअभावी वीजजोड तोडल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठीही बांधकाम विभागाचीच हडेलहप्पी होती.

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीला गेल्या वर्षीपासून गळती आहे. गेल्या वर्षीचा पावसाळा त्यांनी कसाबसा काढला. यंदाही तीच स्थिती असताना दुरुस्तीसाठी निधीची कोणतीच तजवीज केली नाही.

छताचा भाग कोसळला

गेल्या वर्षी माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी धनवे यांच्या कार्यालयातील छताचा भाग कोसळला होता. यंदाही तेथे गळती आहे. तेथे तसेच शेजारील खोल्यांमध्ये बसून काम करणे जिकिरीचे झाले आहे. छताला गळती लागली आहे. पाणी मुरल्याने छत तसेच भिंती धोकादायक बनल्या आहेत. एकंदरीत झेडपीचे मुख्यालयच धोकादायक असताना शाळांची स्थिती चांगली असावी, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे लक्षण ठरेल, अशी स्थिती आहे.

आही काय करणार - ध्रुपद

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची जबाबदारी आहे. त्या विभागाचे प्रमुख ध्रुपद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निधीच नाही, तर आम्ही तरी काय करणार. गेल्या वर्षीपासून ही स्थिती असल्याचे विचारल्यानंतरही त्यांनी तेवढ्याच रूक्षपणे सरकारी उत्तर दिले.