Road Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan : सातारा ते कागलपर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत सुमार दर्जाचे

टेंडरनामा ब्युरो

कऱ्हाड (Karhad) : राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागलपर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत सुमार दर्जाचे आहे. त्याचा दर्जा सुधारण्यासाठी कठोर पावले उचला, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेत केली.

आमदार चव्हाण यांनी सातारा ते कागल महामार्गावर तासवडे व किणी येथे बेकायदा टोल वसुली होत असल्याच्या प्रश्‍नावर चर्चा केली. आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत सुमार दर्जाचे आहे. मार्गावरील तासवडे व किणी येथे टोल नाक्यावर महामार्गाच्या देखभालीकरिता घेण्यात येणाऱ्या टोल वसुलीबाबत ४० टक्क्यांऐवजी ७५ टक्के इतका वसूल केला जात आहे. टोल वसुली ज्यापद्धतीने केली जाते, त्यापद्धतीने रस्त्याचा दर्जा नाही. त्यामुळे याबाबत सरकारने कठोर धोरण करण्याची गरज आहे. हा राष्ट्रीय महामार्ग कऱ्हाड शहरातून जातो. या महामार्गावरील रस्ता अत्यंत सुमार दर्जाचा आहे. त्यामुळे अनेक अपघात या मार्गावर घडले आहेत.

रस्त्याचा दर्जा सुमार असला तरी या रस्त्याची देखभाल त्यापद्धतीने केली जात नाही, तरी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली करून लूट केली जात असल्याचे निदर्शनास येते. आता तर या मार्गावर सहा लेनचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिकची समस्या होत आहे. अपघाताच्या घटनाही घडत आहेत. अनेक मोठे पूल या मार्गावर बांधले जात असून, त्याचे डिझाईन काही ठिकाणी चुकले असल्याचे दिसून येते. शासनाने याबाबत धोरण ठरवून उपाययोजना केल्या पाहिजेत,’’ असेही त्यांनी सांगितले.