कोपरगाव (Kopargaon) : गोदावरी कालव्यांची वाहन क्षमता कमी होऊन सिंचनावर होणारा परिणाम दूर करण्यासाठी गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करताना ३०० कोटींच्या निधीला मंजुरी मिळविली होती. त्या निधीतून आजवर ७२ कोटींची कामे पूर्ण झाली. पुढील कामांसाठी १९५ कोटींच्या कालवे दुरुस्तीचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
अवर्षणग्रस्त तालुक्यासाठी असलेले गोदावरी कालव्याचे आयुष्यमान शंभरी ओलांडल्याने त्याची वहन क्षमता कमी झाली. अनेकवेळा कालवे फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे शेती सिंचनासह साखर कारखाने, छोटे उद्योग तालुक्यांच्या पाणी योजनांना फटका बसत होता. गोदावरी कालव्यांची दुरुस्ती हा मतदारसंघाचा ऐरणीचा विषय झाला होता. आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी गोदावरीच्या कालव्यांना निधी मिळावा यासाठी दुरुस्तीचा आराखडा तयार केला. जलसंपदामंत्र्यांकडे पाठपुरावा करत आमदार काळे यांनी गाऱ्हाणे मांडले होते. त्याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडेही कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याबाबत मागणी केली.
गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटींची तरतूद करून दरवर्षी १०० कोटींचा निधी देण्याचे नियोजन केले होते. आजपर्यंत गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ७२ कोटींचा निधी उपलब्ध झाला. पुढील कामांसाठी ठरल्याप्रमाणे निधी मिळावा याबाबत आमदार काळे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने १९५ कोटींच्या कालवे दुरुस्तीचे टेंडर प्रसिद्ध केल्या आहेत. या निधीतून अस्तरीकरण, माती काम व जीर्ण जुनी बांधकामे नव्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे आवर्तन सुरू असताना सिंचनासाठी येणाऱ्या अडचणी दूर होऊन कालव्यांची वहन क्षमता वाढणार आहे. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.