shambhuraje desai Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

कोयनेतील जल पर्यटन केंद्र त्वरित सुरू करा; मंत्री शंभूराज देसाईंची मागणी

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : कोयना नदीपात्रातील रासाटी ते हेळवाक यादरम्यान पर्यटकांसाठी जल पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. हे केंद्र लवकर सुरू होण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.

चेंबरी (ता. पाटण) येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार अनंत गुरव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता नीलेश पोदार, सहायक अभियंता सागर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘या जल पर्यटनासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. येथील कामांच्या निविदा तत्काळ काढाव्यात. या जल पर्यटनांतर्गत पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या बोटी घेण्यात येणार आहेत. या बोटी चालवण्याचे प्रशिक्षण स्थानिकांना द्यावे. जल पर्यटनांतर्गत मंजूर झालेल्या पायाभूत सुविधांची दर्जेदारपणे कामे करावीत.’’ जल पर्यटनासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबी तत्काळ दूर कराव्यात, अशा सूचना करून देसाई यांनी जल पर्यटनाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीनंतर पालकमंत्री देसाई यांनी कोयनानगर येथे उभारण्यात येणाऱ्या पोलिस वसाहतीच्या जागेची व जलपर्यटन केंद्रांच्या जागेची पाहणी केली.