Solapur Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : धक्कादायक! विमानसेवा पुन्हा सुरु होण्यासाठी साधा प्रस्तावही नाही

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सोलापूरला विमानसेवा सुरू व्हावी म्हणून गेल्या १४ वर्षांपासून म्हणजे एका तपापासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र या कालावधीत विमानसेवा पुन्हा सुरु व्हावी असा साधा प्रस्तावही पाठविण्यात आलेला नाही. सद्यःस्थितीत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे हा प्रस्तावच पाठविण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूर विमानतळाचे अन्य प्रश्न कायम असले तरीही मुळ प्रस्तावच नसणे धक्कादायक ठरले आहे.

सोलापूर-मुंबई विभागासाठी सुरु झालेली विमानसेवा ऑगस्ट २०१० मध्ये बंद पडली. त्यानंतर सोलापूरहून प्रवासी हवाई वाहतूक सुरु झालेली नाही. कधी चिमणीची अडचण तर कधी मोबाईल टॉवर अशा अडचणी मांडण्यात आल्या. विमानसेवा सुरू होण्यात तब्बल १०६ ठिकाणी अडथळे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यापैकी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. त्यालाही जवळपास वर्ष झाले. दुसरीकडे विमानतळावर सुमारे ८० कोटी रुपये खर्चाची कामे सुरु झाली. असे असले तरीही विमानसेवा पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव अद्याप पाठविण्यात आलेला नाही. परिणामी सोलापूरच्या विमानतळावर सेवेच्या अनिश्चिततेचे ढग कायम आहेत.

प्रस्तावाची जवाबदारी कोणाची?

एखाद्या शहरातून विमानसेवा सुरु व्हावी असे वाटत असल्यास संबंधित राज्याने त्याचा प्रस्ताव केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला प्रस्ताव देणे गरजेचे असते. यासाठी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे असते. सोलापुरात दुर्दैवाने असे चित्र दिसत नाही. विमानतळाचा विकास करून हा प्रश्न सुटणार नसून त्यासाठी अन्य औपचारिकता पार पाडाव्या लागणार आहेत.

विमानसेवा सुरु करण्यापूर्वी

- केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल होतो

- त्या सेक्टरमध्ये सेवा सुरु करण्यासाठी इच्छुक असलेल्या विमान कंपन्यांकडे मंत्रालय प्रस्ताव पाठवते

- इच्छुक कंपन्या विमानतळ तसेच प्रवासी संख्येचे सर्वेक्षण करतात

- सर्वेक्षणाचा अहवाल मंत्रालयाकडे सादर केला जातो

- या अहवालानुसार मंत्रालयाकडून सेवेबाबतचा निर्णय घेतला जातो

सोलापूरला विमानसेवा सुरू करण्यासाठीचा कोणताच प्रस्ताव केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंवर सोलापूरची विमानसेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री