Nagpur Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात 511 मेगावॅटचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारणार

टेंडरनामा ब्युरो

कोल्हापूर (Kolhapur) : महावितरणच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ९५ उपकेंद्रांजवळ ५११ मेगावॅटचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात ३७ उपकेंद्रांजवळ १४० मेगावॅट, सांगली जिल्ह्यात २५ उपकेद्रांजवळ १७३ मेगावॅट आणि सातारा जिल्ह्यात ३३ उपकेंद्रांजवळ १९८ मेगावॅट सौर प्रकल्पांचा समावेश आहे.

कोळसा टंचाई, अतिवृष्टी किंवा पावसाने दिलेली ओढ आदी कारणांमुळे वीज निर्मितीवर होणारा परिणाम तसेच विजेची वाढती मागणी व पुरवठ्यातील तुटीचा यापुढे शेतीच्या वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. शेतीला दिवसा सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ ची वेगाने अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात ३७ उपकेंद्रांजवळ १४० मेगावॅट, सांगलीत २५ उपकेद्रांजवळ १७३ मेगावॅट आणि सातारा जिल्ह्यात ३३ उपकेंद्रांजवळ १९८ मेगावॅट सौर प्रकल्पांचा समावेश आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असलेले २ हजार १९७ एकर खासगी जमिनींचे १९६ प्रस्ताव महावितरणकडे प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त गायरान जमिनी देण्याचा ठराव विनाविलंब मंजूर करावा व शेतकऱ्यांसह गावाच्या आर्थिक विकासाला हातभार लावावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले.