Lift Irrigation Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Mhaisal Irrigation Scheme : 'म्हैसाळ'साठी 981 कोटींचे टेंडर

म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस राज्य सरकारची मंजुरी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांसाठी २००० कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. कामाच्या पहिल्या टप्प्यातील ९८१ कोटींच्या कामाचे टेंडर नुकतेच जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केले आहे.

जिल्ह्याचा पूर्व भाग हा कायम पाण्यापासून वंचित व दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांनी जिल्ह्याच्या पूर्व भागासाठी पाणी योजना तयार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच पुढे टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या योजना सुरू झाल्या. टप्प्याटप्प्याने या योजनांचा विस्तार होत गेला. मात्र जत तालुक्यातील 48 गावे पाण्यापासून वंचित आहेत. पाण्यासह विविध प्रश्नाबाबत तालुक्यातील या गावांनी अनेक वेळा आवाज उठवला. अखेरीस काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जत तालुक्यातील पाणी प्रश्न आणि विकासाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली.

राज्य सरकारमधील मंत्र्यांनी तत्काळ जत तालुक्यात धाव घेऊन लोकांना पाण्यासह विविध विकास कामाबाबत आश्वासन दिले. म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ पैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. मात्र पूर्व भागातील ६५ गावे पाण्यापासून वंचित होती. त्यांना पाणी देण्यासाठी राज्य शासनाने विस्तारित म्हैसाळ योजनेमधून 'जत उपसा सिंचन योजना' नावाने प्रकल्प मंजूर केला आहे. सुरुवातीस या योजनेसाठी 5 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यात एक हजार कोटीची दरवाढ आणि आणखी दोन हजार कोटी असे आठ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्रीमंडळाच्या बैठकीत विस्तारीत योजनेस मंजुरी देण्यात आली. तसेच यामधील सुमारे 1 हजार कोटींच्या कामांची टेंडर काढून लवकर कामे सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी सरकारने १ हजार ९२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

टप्पा क्रमांक एक, दोन आणि तीन येथे पंपगृह, उर्ध्वगामी नलिका, टप्पा क्रमांक एक व दोनमधील जोड कालवे, बोगदा आदींच्या कामाची ९८१ कोटींच्या कामाचे टेंडर नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. २१ फेब्रुवारीपर्यंत टेंडर दाखल करता येणार आहे आणि २३ फेब्रुवारीला टेंडर उघडण्यात येणार आहेत. टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन साधारण २ महिन्यात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील उच्चपदस्थांनी दिली.