Potholes Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar : संगमनेर-नेवासे रस्ता ‘पांढरा हत्ती’; तात्पुरत्या मलमपट्टी ऐवजी हवा...

टेंडरनामा ब्युरो

श्रीरामपूर (Shrirampur) : शहरातून जाणारा संगमनेर-नेवासे रस्ता बांधकाम विभागाकडे असला, तरी संगमनेर नाक्यापासून पालिका हद्दीपर्यंत चार किलोमीटर रस्त्याची देखभाल दुरुस्ती श्रीरामपूर पालिका करते. संगमनेर-नेवासे व गोंधवणी रस्त्यावरील अतिक्रमण वाचविण्यासाठी पांढरे हत्ती ठरू पाहत असलेल्या या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती पालिकेने स्वतःकडे ओढवून घेतली आहेत.

या दोन्ही रस्त्यांना दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीतून अर्ध्याहून अधिक शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागू शकतात, पण आलिया भोगासी, असावे सादर अशी गत पालिकेची झाली आहे. मे २०२१ मध्ये नॉर्दर्न ब्रांच ते भाजी मंडई व शिवाजी चौक ते भारत गॅसपर्यंत, असे दोन टप्प्यांत एक कोटी ३० लाख रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले, मात्र त्यावर एक ते दोन इंचच हॉटमिक्सचा थर असल्याने एकाच पावसात या रस्त्याची वासलात झाली. हनुमान मंदिर ते आयडीबीआय बँक दरम्यान असंख्य खड्डे पडले. त्यामुळे वाहनधारकांबरोबर उडणाऱ्या मातीचा त्रास रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या व्यावयासिकांना सहन करण्याची वेळ आली. तक्रारी वाढल्यानंतर डागडुजी करण्यात आली. तीही तात्पुरती टिकल्याने यावर पुन्हा खड्ड्यांची मालिका उभी राहिल्याने रस्ता झाल्यानंतर दीड वर्षात दुसऱ्यांदा डागडुजी करण्याची वेळ पालिकेवर आली होती. आता, पुन्हा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अपघातांची मालिका सुरू आहे. वाहन गेल्यानंतर मोठ्याप्रमाणात धूळही उडते. याला परिसरातील व्यावसायिक, वाहनधारक, पादचारी वैतागले आहेत. कोट्यवधींचा खर्च करूनही वारंवार या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका उभी राहते. याचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाहनांबरोबर हाडेही खिळखिळी होत आहेत.

संगमनेर-नेवासे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेने नगर विकास विभागाकडे २० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा रस्ता चार किलोमीटर लांब व ३० मीटर रुंद आहे. गेल्यावेळी दुरुस्ती करताना १५ मीटर डांबरीकरण करण्यात आले होते. आता दुभाजकापासून दोन्ही बाजूला नऊ-नऊ मीटर व दुभाजक, असे २० मीटर डांबरीकरण सुचविण्यात आले. उर्वरित १० मीटर रस्ता कागदोपत्रीच दिसणार असून, त्यामुळे अतिक्रमणाला खतपाणीच पालिकेकडून घातले जात आहे. हनुमान मंदिर ते पाटणी विद्यालया दरम्यानचा इतके खड्डे पडेलेल की, रस्त्याला रस्ता म्हणावे का? असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे नव्याने रस्ता करताना या भागात डांबरीकरण न करता खडीकरणही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

भाजपला घरचा आहेर

सध्या पालिकेवर प्रशासक असला तरी बहुतांश भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चलती आहे. असे असताना गेल्या आठवड्यात नगरपरिषदेला जाग येण्यासाठी शहर भाजपतर्फे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे.