Road Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड-चिपळूण महामार्गाची दुरावस्था; डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पहिल्या पावसात खड्डे

टेंडरनामा ब्युरो

पाटण (Patan) : पाटणपासून घाटमाथ्यापर्यंतचे रुंदीकरण न झालेल्या रस्त्यांची दुरवस्था वाहनचालकांच्या नाकीनऊ आणणारी आहे. चार महिन्यांपूर्वी केलेली डांबरीकरणाची मलमपट्टी आता जून महिन्यातील पावसाने खड्ड्यात रूपांतरित झाली आहे. उन्हाळ्यात डांबरीकरण आणि पावसाळ्यात खड्डे हे अजून किती दिवस चालणार? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

केंद्र सरकारने २०१४ मध्ये या राज्यमार्गाचे रूपांतर महामार्गात केले. विहे ते घाटमाथा असा हा महामार्ग तालुक्यातून जातो. २०२१ पर्यंत ठेकेदार कंपनीने कऱ्हाड ते म्हावशी, रामापूर (पाटण) ते तामकडे आणि मारुल तर्फ पाटण ते मणेरी गौंड या मार्गावर रडतखडत काँक्रिटीकरण झाले. झालेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी काही कामे अपूर्ण असतानाच कंपनीने गाशा गुंडाळून पळ काढला. म्हावशी ते राजापूर, येराड ते शिरळ आणि मेणेरी गौंड ते घाटमाथा यादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. गेली सात वर्षे या मार्गावर कधी खड्डे भरले जातात, तर कधी संपूर्ण रस्ता डांबरीकरण केला जातो. रस्त्याची डागडुजी झाल्यावर दोन ते तीन महिने एकवेळ खड्ड्यातून सुटका होते. सुरुवातीला दोन दिवस मुसळधार पाऊस पडला, की रस्त्यावर खड्डे पडू लागतात. या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी व रखडलेल्या कामासाठी चांगला मुहूर्त पाहून कामाची सुरुवात करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

जनतेने आंदोलनाचा इशारा दिला, की पालकमंत्री शंभूराज देसाई अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. तातडीने कारवाई करण्याचे आदेश देतात; परंतु त्या आदेशाचे पुढे काय होते? असा प्रश्‍न यानिमित्ताने जनतेमधून होत आहे.