Jal Jeevan Mission Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Kopargaon : कोपरगावकरांसाठी गुड न्यूज! 'तो' ड्रीम प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात

टेंडरनामा ब्युरो

कोपरगाव (Kopargaon) : शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावून शहराचा सर्वांगीण विकास करणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांनी ३२३.३१ कोटीच्या भूमिगत गटार योजनेला तांत्रिक मंजुरी मिळवून शहरवासीयांसाठी गुड न्यूज दिली आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शहरातील भूमिगत गटारींसाठी निधी मिळावा यासाठी आमदार काळे यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा केला होता. वाढते शहरीकरण, उपनगरांचा हद्दवाढीत समावेशाच्या पार्श्वभूमीवर योजनेला अन्यय साधारण महत्त्व आहे. शहरवासीयांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून पाच नंबर साठवण तलाव हा ड्रीम प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात आहे.

येत्या काही दिवसांत नागरिकांना नियमितपणे मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या मुबलक सांडपाण्याचे योग्य नियोजन होऊन कोपरगावकरांचे आरोग्य देखील अबाधित राहावे यासाठी संपूर्ण शहरात भूमिगत गटारी होणे खूप गरजेचे होते. तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी या प्रस्तावाला मंजुरी मिळावी याबाबत आमदार काळे यांनी चर्चा केली होती.

उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही त्यावेळी दिली होती. केवळ एका आठवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने योजनेला तांत्रिक मंजुरी दिली असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.

आमदार आशुतोष काळेंचा षटकार

राज्याच्या विधानसभेची आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्याने आपल्या कारकिर्दीतील उत्तरार्ध कार्यकाळात आमदार आशुतोष काळे यांनी षटकार मारला आहे. कोपरगावच्या इतिहासात तीन हजार कोटीचा निधी कोणालाच आणता आला नाही, ते काम आशुतोषने करून दाखविले असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अशोक काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात जाहीरपणे केली होती. भूमिगत गटारीसाठीच्या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाल्याने हा आकडा जवळपास साडेतीन हजार कोटीवर गेला आहे.