कोल्हापूर (Kolhapur) : जिल्हा परिषदेच्या (Kolhapur Zilla Parishad) ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जल जीवन मिशनचे (Jal Jivan Mission) काम युध्दपातळीवर सुरु आहे. जिल्ह्यात जुन्या योजनांची दुरुस्ती आणि नवीन मिळून १ हजार पाणी योजना होणार आहेत. मात्र या योजनांचे काम करत असताना अंदाजपत्रकाच्या पाच आणि दहा टक्के लोकवर्गणी भरावी लागणार आहे. सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे पाणी पुरवठा विभागाकडून दणादण टेंडर प्रसिद्ध करण्यात आली. मात्र सरकारच्या अटीप्रमाणे कामाचे आदेश देण्यापूर्वी लोकवर्गणी भरणे आवश्यक आहे. सध्या तरी एकाही गावाने वर्गणी भरली नसल्याने कामाचे आदेश देण्यात आलेले नाहीत. कामाचे आदेश नसल्याने या योजनेतून सध्या एकही काम सुरु झालेले नाही. आता लोकवर्गणीवरही तोडगा काढावा, सवलत मिळावी, यासाठी धडपड सुरु झाली आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय पेयजल योजनेऐवजी आता जल जीवन मिशन ही योजना आणली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत नळाने पाणी पुरवठा करणे, प्रती माणसी ५५ लिटर शुध्द, स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणे, स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, शाळा, अंगणवाडी, सरकारी इमारतींना नळाने पाणी आदी प्रमुख उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. गेल्या चार, पाच महिन्यांपासून जिल्ह्यात जल जीवन मिशनवर खडाजंगी चर्चा सुरु आहे. प्रत्येक जलव्यवस्थापन समिती सभा, स्थायी आणि सर्वसाधारण सभेची सुरुवातच जल जीवन मिशन योजनेवरुन होत आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने युध्दपातळीवर काम करुन पाणी योजनांची अंदाजपत्रके बनवली आहेत. त्याचबरोबर आजअखेर १६० पाणी योजनांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. आता वर्क ऑर्डर देण्याची वेळ आली असताना पाणी योजनेच्या लोगवर्गणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जल जीवनमध्ये डोंगरी भागातील पाणी योजनेसाठी ५ टक्के तर डोंगरी नसलेल्या तालुक्यांना १० टक्के लोगवर्गणी भरावी लागणार आहे. सरकारकडून पाणी योजनेला १०० निधी दिला जाणार आहे. मात्र लोकवर्गणीची रक्कम ही गावाच्या देखभाल दुरुस्ती खात्यावर जमा करावी लागणार आहे. ही वर्गणी ग्रामस्थांनीच देणे आवश्यक आहे. मात्र अजुनतरी एकाही गावाने लोकवर्गणी भरलेली नाही. गावची लोकवर्गणी ही कंत्राटदाराकडून भरली जात असल्याचा आजवरचा अनुभव आहे. लोकांचा लोकवर्गणीत काहीच वाटा नसल्याने योजनेच्या दर्जावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आले आहे. आताही फारशी वेगळी परिस्थिती नाही.
लोकवर्गणी भरावीच लागेल
जल जीवन मिशनसाठी लोकवर्गणी अत्यावश्यक आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या देखभाल दुरुस्ती खात्यावर ती जमा करावयाची आहे. सध्या तरी एकाही गावाने ही वर्गणी भरलेली नाही. जोपर्यंत गावाच्या खात्यावर लोकवर्गणी जमा होत नाही, तोपर्यंत एकाही गावाची वर्क ऑर्डर दिली जाणार नाही. मात्र एकाच वेळी सर्व लोकवर्गणी भरायची की दोन टप्प्यात याबाबत चर्चा सुरु आहे.
- अशोक धोंगे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा