Hasan Mushrif Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

टेंडर प्रक्रियेचा कालावधी कमी करा, अन्यथा...

टेंडरनामा ब्युरो

कोल्‍हापूर (Kolhapur) : कोरोनाच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने टेंडर (Tender) प्रसिद्धीचा कालावधी आठ दिवसांचा केला होता. याची मुदत ३० नोव्‍हेंबरला संपली असून, त्यामुळे पुढील टेंडर हे पुन्‍हा ३० दिवसांचे असणार आहेत. परिणामी अनेक अडचणी निर्माण होणार असून त्याचा विकासकामांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आठ दिवसाच्या टेंडर मर्यादेला जिल्‍हा परिषद निवडणुकीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जिल्‍हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती रसिका पाटील (Rasika Patil) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे केली आहे. दोन दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने कोरोनामुळे कमी कालावधीच्या टेंडर प्रक्रियेला मंजुरी दिली होती. त्यामुळे ३० दिवसांऐवजी ८ दिवसात टेंडर प्रक्रिया पूर्ण होत होती. या कालावधीत दोन वेळा वाढ करण्यात आली. मात्र, ३० नोव्‍हेंबरला टेंडर कालावधी कमी करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता येथून पुढे होणाऱ्या टेंडर प्रक्रियेला ३० दिवस लागणार आहेत.

जिल्‍हा परिषदेची निवडणूक जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जर टेंडर कालावधी कमी केला नाहीतर विकासकामांत अडथळा निर्माण होणार आहे. निधी असूनही टेंडर न झाल्याने विकास कामांवर परिणाम होणार आहे. विकास कामे झाली नाहीतर लोकप्रतिनिधींवर खापर फुटणार आहे. त्यामुळेच टेंडर प्रक्रिया पुन्‍हा एकदा आठ दिवसांचीच करावी, अशी मागणी करणारे निवेदन रसिका पाटील यांनी मुश्रीफ यांना दिले.