सोलापूर (Solapur) : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीला शक्तिपीठ महामार्गाचा महायुतीला जबर फटका बसल्याने सत्ताधारी पक्ष सावध झाला असून, शक्तिपीठ महामार्गाचा वाढता विरोध लक्षात घेऊन महायुतीतील प्रमुख नेत्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची सर्व ताकद या प्रकल्पाच्या विरोधात वापरणार असल्याचे वक्तव्य नुकतेच केले आहे.
कंत्राटदारांचे खिसे भरणारा प्रकल्प
नागपूर- रत्नागिरी असा पर्यायी महामार्ग उपलब्ध असतानाही नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले असून यासाठी २७ हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे. अनेक पर्यायी रस्ते, महामार्ग उपलब्ध असताना ८५ हजार कोटी रुपये खर्च करून कंत्राटदारांचे खिसे भरणारा महामार्ग शेतकरी, जनतेवर लादला आहे, असा मुद्दा मांडून शेतकऱ्यांकडून या महामार्गाच्या भूसंपादनाला प्रखर विरोध होत आहे.
ठळक बाबी
- जमीन मोजणीला येणाऱ्यांना ठोकून काढा, राजू शेट्टी यांची आक्रमक भूमिका
- संघर्ष समितीचाही सातत्याने आंदोलन करीत प्रकल्पाला विरोध
- रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावर आजही वाहतूक कमीच
- नागपूर - गोवा महामार्गाची आवश्यकता तपासण्याची गरज
- सांगली व कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या मोर्चा
विधानसभेलाही मारक मार्ग
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार संजय घाटगे, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, सांगली येथील शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे, डॉ. अजित नवले यांनी हे आंदोलन आणखी तापवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवरही शक्तिपीठ महामार्गाचा परिणाम होण्याची शक्यता आतापासून दिसू लागली आहे.
मंत्रीदेखील विरोधात
वैद्यकीय शिक्षक मंत्री हसन मुश्रीफ यांनीही संजय मंडलीक यांच्या पराभवातील एक प्रमुख कारण शक्तिपीठ प्रकल्प असल्याचे म्हटले आहे. शक्तिपीठ प्रस्ताव महामार्ग रद्द व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही कारणे पुन्हा येणार नाहीत. त्यावरून लोक नाराज होणार आहेत याची दक्षता आम्हाला घ्यावी लागेल,' असे विधान मुश्रीफ यांनी केले आहे.
आकडे बोलतात
महामार्गाची एकूण लांबी ८०० किलोमीटर
महामार्गबाधित जिल्ह्यांची संख्या ११
एकूण भूसंपादन २७ हजार एकर
प्रकल्पाचा एकूण खर्च ८६ हजार कोटी
एकूण बारा हजार ५८९ गट होणार बाधित
सोलापूरचे नेते गप्पच
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून विरोध होत असताना सोलापूरचे नेते या महामार्गाला कोणताही विरोध करताना दिसत नाहीत. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या मते काही शेतकऱ्यांचा विरोध असला तरी काहींना महामार्ग व्हावा असे वाटते. यामुळे आपण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मग भूमिका ठरविणार आहोत. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे आजारी आहेत. मात्र, यापूर्वी त्यांनी या मार्गाला विरोध केलेला नाही. तर मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.