Khambatki Ghat Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : ‘खंबाटकी’तील नवीन बोगद्यांसाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा; ‘एस’ वळणावर मृत्यूची शंभरी

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : खंबाटकी घाटातील नवीन दोन्ही बोगदे आणि रस्त्याचे काम आणखी वर्षभर तरी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बोगद्यातूनच घाटमार्गे प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे हा घाटमार्ग आता सुरक्षित राहिला नसून धोकादायक बनला आहे. त्यासाठीच नवीन बोगद्याचे काम तत्काळ आणि वेळेत पूर्ण व्हावे, अशी वाहनचालक, प्रवासी व स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे. दरम्यान, मार्च २०२४ अखेर हे काम पूर्ण करावे, अशा सूचना असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून सांगण्यात आले.

या कामास प्रत्यक्षात चार वर्षांपासून (२०१९) सुरुवात झाली. या कामास जवळपास ४९३ कोटी रुपये मंजूर झाले. पुढील आठ महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची कालमर्यादा असली, तरी या ठिकाणी अद्यापही उड्डाणपुलाचे सिमेंट-क्राँक्रिटचे खांब उभारणे बाकी आहे. पुलावर सिमेंटचे आडवे बीम उभारणे, त्यावर रस्ता करणे, बॅरिकेट्स उभारणे व जुन्या टोल नाक्यापर्यंत भराव पूल बांधणे व अन्य दीर्घकालीन कामे अद्यापही प्रलंबित दिसून येत आहेत. दोन्ही बोगदे खोदून झाले, तरी त्यातील रस्ता करणे, आतील भागातील चढ काढणे, सांडपाणी व विजेची सोय करणे, ही कामेही अद्यापपर्यंत झालेली नाहीत. त्यामुळेच मार्च २०२४ म्हणजेच, आठ महिन्यांत हे काम पूर्ण होण्याचे शिवधनुष्य पेलणे शक्य होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणास विचारणा केली असता, ही मुदत वाढविण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे- बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेल्या ‘एस’ वळणावर मृत्यूची शंभरी ओलांडणाऱ्या या ब्लॅक स्पॉटवर उपाय काढण्याच्या अनेक वल्गना झाल्या. यातून नवीन बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात काम हे कासव गतीने होत आहे. ते सुरू होऊन चार वर्षे झाले, तरी आजही काम रेंगाळलेले दिसत आहे. अनेकांच्या जिवावर उठणाऱ्या या प्रकारांवर आता तरी ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

पुणे- बंगळूर महामार्गाच्या चौपदरीकरणात खंबाटकी घाटात पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बोगदा तयार केला; परंतु या बोगद्याच्या पुढील रस्ता बनविताना झालेली ‘एस’ वळणाची त्रुटी अनेकांची जीव घेणारी ठरली आहे. खंडाळा बोगद्याच्या पुढे असलेल्या धोकादायक ‘एस’ वळणावर गेल्या दहा वर्षांत शंभरपेक्षा जास्त जणांची आयुष्यरेषा संपवली आहे. शेकडोंना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. एवढ्या कुटुंबांना उघड्यावर आणणारी ही चूक दुरुस्त करण्याचे काम म्हणून नवीन दोन सहापदरी बोगद्याला मंजुरी मिळाली. बोगदेही खोदून झाले. मात्र, पुढील असणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तरी कायम असुरक्षित असलेल्या या मार्गावरील काम लवकर व्हावे, याचे प्रशासनाला, महामार्ग प्राधिकरणाला जाणीव हवी.
दरम्यान, वारंवार होणारे अपघात पाहता त्यातून स्थापन झालेल्या समितीने हे वळण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर केले. या समितीने तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजनाही सुचविल्या.

पुढे या वळणावरची कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवीन बोगद्याचे व रस्त्याचे काम मंजूर केले. मात्र, अद्याप हे काम पूर्णत्वास जाण्यास मुहूर्त मिळालेला नाही. चुकीच्या पद्धतीने रस्ता तयार करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जातो. त्याचप्रमाणे दिरंगाई होणाऱ्या कामावरही बडगा उभारावा, तरच हे मृत्यूचे तांडव थांबण्यासाठी ठोस प्रयत्न होऊ शकेल, अशा स्थानिक नागरिकांच्या भावना आहेत. काही वर्षांपूर्वी खासगी निमआराम बसच्या अपघातानंतर खंडाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक श्रीधर जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. ठोस उपाययोजनांच्या आखणीला वेग आला होता. त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याने आता अशीच ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.