कऱ्हाड (Karhad) : देशपातळीवर स्वच्छ सुंदर शहर म्हणून गौरव झालेल्या कऱ्हाड पालिकेने आता कचरा व्यवस्थापनावर भर दिला होता. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरातील सर्व घरांतील आणि व्यावसायिकांचा कचरा जमा करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. सरकारच्या खर्चातून आता क्यूआर कोड स्कॅन करून कचरा घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे कचरा संकलनाची माहिती तत्काळ पालिकेला उपलब्ध होणार आहे. त्यातून पालिकेकडे कचऱ्यासंदर्भातील डाटाही जमा होणार होता. मात्र, क्यूआर कोड लावून चार-पाच महिने होत आले, तरीही त्याची कार्यवाहीच सरकारकडून सुरू झालेली नाही. त्यामुळे ते क्यूआर कोड शोपीसच बनल्याचे चित्र शहरात आहे.
घनकचरा संकलनाच्या देखरेखीसाठी राज्य सरकारने आयटी बेस प्रणाली कार्यरत केली आहे. याअंतर्गत विविध शहरांमध्ये मिळकती, ओला व सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यावर विशिष्ट कोडचे स्टीकर लावण्यात येत आहेत. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीमध्ये कचरा घेतल्यानंतर सदरचे कोड स्कॅन केले जाणार आहेत. हा कोड स्कॅन केल्यानंतर याची माहिती ऑनलाइन अॅपमध्ये मिळणार आहे. या अॅपवर शहरात कोणत्या भागात कचरा घेण्यात आला आहे, याची माहिती मिळणार आहे. कऱ्हाड शहरात कर विभागाकडील २०१९ च्या माहितीनुसार १२ हजार ९०० घरगुती, तर पाच हजार १४१ कमर्शिअल मिळकती आहेत. शहरात रोज १३ ते १४ टन घनकचऱ्याचे संकलन घंटागाड्यांद्वारे होते. यात सुमारे आठ टन ओला कचरा तर सुमारे सहा टन सुका कचरा रोज संकलित केला जातो. १०० टक्के कचरा संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया यावर पालिकेने भर दिला आहे. शहरात क्यूआर कोड लावण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. मुख्याधिकारी शंकर खंदारे व आरोग्य विभागाचे प्रमुख रफीक भालदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बहुतांश मिळकती व प्रत्येक घरातील ओला व सुका कचऱ्याच्या डब्यावर क्यूआर कोडचे स्टीकर लावण्यात आले आहेत.
कोड स्कॅन करून होणार होते संकलन
शहरातील प्रत्येक घरातील दररोजचा कचरा संकलनासाठी टेंडर देण्यात आलेले असून, घंटागाडीकडून प्रत्येक भागात संकलन करावे लागणार आहे. शहरातील सर्व घरांतील व व्यावसायिकांच्या कचरा साठवण्याच्या डब्याला क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. त्याद्वारे रोजच्या रोज कचरा संकलनाची माहिती क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे अॅपवर पालिकेला मिळेल, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र, त्याची कार्यवाही पुढे सरकलेलीच नाही.
पाच महिन्यांनंतरही कार्यवाही शून्यच
कचरा संकलनासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचा चांगला उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे. त्यासाठीची कार्यवाहीही पूर्णत्वाकडे आलेली आहे. मात्र, पाच महिन्यांनंतरही त्याची काहीच कार्यवाही पुढे सरकलेली नाही. त्यामुळे ही कार्यवाही केव्हा सुरू होणार, याबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे.
क्यूआर कोडद्वारे कऱ्हाड शहरातील कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. त्यासाठी शासनाने संबंधित एजन्सी नेमली आहे. त्याद्वारे ही कार्यवाही पूर्णत्वाकडे आली आहे. लवकरच ते काम सुरू केले जाणार आहे. जेथे स्टीकर निघाले असतील ते परत लावण्यास सांगितले जातील.
- आर. डी. भालदार, कऱ्हाड पालिका