Karad Nagarpalika Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Karhad : पहिल्याच पावसात पालिकेने केलेल्या मॉन्सूनपूर्व कामांची पोलखोल

टेंडरनामा ब्युरो

कऱ्हाड (karhad) : मॉन्सूनपूर्व पावसाने शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाच्या मुसळधारेने मात्र पालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोलच झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले. काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे चेंबर तुंबल्याने होऊन त्यातील घाण रस्त्यावर आली. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे पालिकेने दुप्पट वेगाने मोहीम राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

शहरासह तालुक्यात आठवड्यापासून पडत असलेल्या पावसाने दैना उडत असल्याचे शहरात चित्र आहे. पालिकेने पावसाळी हंगामपूर्व कामे केल्याचा दावा केला होता. त्या दाव्याची पोलखोलच मुसळधार पावसाने केली आहे. शहरात अनेक ठिकाणी गटार तुंबल्याने पाणी साचून राहिले. त्याचबरोबर काही ठिकाणी चेंबरही तुंबल्याने त्यातील घाण आणि सांडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. त्यावर तातडीने उपाययोजना करून पूर्ववत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महामार्गाची पुरती लागली वाट

पुणे-बंगळूर महामार्गावरील उड्डाणपूल उभारणीचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी पूर्वीच्या सेवा रस्त्यावरून सध्या महामार्गावरील वाहतूक सुरू आहे. त्या मार्गावर येणारे पावसाचे पाणी जाण्यासाठीची सोयच करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. परिणामी, कोल्हापूर नाक्यावरून शहरात येण्यासाठी हलक्या वाहनांसाठी करण्यात आलेला रस्ता वाहतुकीस पाणी जाईपर्यंत बंदच ठेवावा लागला. त्याचबरोबर साताऱ्याकडून कऱ्हाडमध्ये येणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने त्या परिसरातून मार्ग काढताना वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. त्याकडेही संबंधित यंत्रणेचे दुर्लक्षच झाले आहे.

रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हच

कोल्हापूर नाक्याकडून शहरात येणारा रस्ता पालिकेने मध्यतंरी पाइपलाइन टाकण्यासाठी खोदला होता. त्यानंतर त्या रस्त्यावर भराव टाकून डांबरीकरणही करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसानंतर त्यावरून अवजड वाहने गेल्यावर तो रस्ता खचला आहे. त्यामुळे त्या मार्गावरील रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच्याच पावसात ही दैना झाल्याने पुढे काय अवस्था होणार? अशी विचारणा नागरिक करत आहेत.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पाण्यातच

नागरिकांच्या सोयीसाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. तेथे प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधकसह अन्य कार्यालये आहेत. या परिसरात लोकांची वर्दळ असते. कालच्या पावसाने त्या इमारतीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे त्या मार्गावरील ये-जाच बंद झाली होती.

सफाईची मोहीम पुन्हा राबविण्याची गरज

शहरातील गटारांमध्ये अजूनही अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा साचत असल्याने पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत. पावसाने काही ठिकाणी गटार ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर गटाराचे पाणी रस्त्यावर वाहिले. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून राहिले. त्यामुळे पालिकेने पावसाळा सुखकर जाऊन पाणी न साचण्यासाठी पुन्हा नालेसफाईची मोहीम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचेच त्यातून अधोरेखित झाले आहे.

शहरातील पाणी साचणारी ठिकाणे

* मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे पार्किंग

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील परिसर

* गुजर हॉस्पिटलसमोरील परिसर

* डीवायएसपी ऑफिसच्या समोरील रस्ता परिसर

* कोल्हापूर नाक्याचा परिसर

* भेदा चौकाचा परिसर

* जोतिबा मंदिराच्या समोरील परिसर

* रुक्मिणी हाईट्‌स परिसर

* एलआयसी कार्यालयासमोरील परिसर

कऱ्हाड नगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. लवकरच ती पूर्ण करून घेण्यात येतील. नागरिकांनी प्लॅस्टिकचा कचरा गटारामध्ये जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.

- शंकर खंदारे, मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका