Pune Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडला पावसाने रस्त्यांची धूळधाण; दर्जाहीन कामावरील कारवाईकडे दुर्लक्ष, ठेकेदारांवर मर्जी

टेंडरनामा ब्युरो

कऱ्हाड (Karhad) : शहरात सलग झालेल्या पावसामुळे मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यांची धूळधाण उडाली आहे. रस्ते उखडल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांच्‍या दुरवस्थेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसात रस्ते खराब झाल्याने त्यांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेचे दुर्लक्ष, ठेकेदारांना मिळणारे अभय हे विषय यामुळे चर्चेत आले आहेत. इतरवेळी नगरसेवकांवर दोष ढकलणारे पालिकेतील अधिकारी प्रशासकीय कालावधीत सुस्‍त आहेत. त्यांच्या सोयीस्कर भूमिकाही संशयास्पद ठरत असताना निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होणार का? असा नागरिकांचा प्रश्न आहे.

कारवाईची केवळ चर्चा

शहरातील दत्त चौक ते चावडी चौक ते कमानी मारुती आणि चावडी चौक ते कृष्णा घाट रस्त्याच्‍या दुरवस्थेची जोरदार चर्चा यापूर्वी झाली होती. निकृष्ट कारपेटवरून पालिकेत मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यावेळी रस्त्यांची कामे, निविदा व कामाच्‍या दर्जावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. दर्जाहीन कामांवरील ठेकेदारांवर कारवाईची केवळ चर्चा झाली. प्रत्यक्षात त्यांना अभय मिळाले होते. शहरातील रस्त्यांचा विषय मार्गी लावल्याची घोषणाही त्यावेळी हवेत विरली होती. त्यानंतर प्रशासकांच्या काळातही तीच अवस्था आहे. अनेक रस्त्यांचे कारपेटचे काम पावसाळ्यात निकृष्ट झाल्याचे दिसते.

सोशल ऑडिटची गरज

प्रशासकांच्या काळात तरी खराब रस्त्यांच्या कामांचे सोशल ऑडिट होण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. सलग पावसाने झालेली रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा चर्चेत आहे. निकृष्ट रस्त्याची कामे करणाऱ्यांची अनामत रक्कम जप्ती, जप्त रकमेतून दुरुस्ती आदी निर्णय अर्धवट आहेत. रस्ता झाला, की त्याकडे कधीच लक्ष दिले जात नाही. काही रस्त्यांची अवस्था चांगली असतानाही तेथे पुन्हा रस्ता केला गेला, तर जेथे रस्त्यांची गरज होती, तेथे डागडुजी केल्याने ते रस्ते पावसाळ्यात उखडल्याचे दिसते.

हद्दवाढ भागात मोठा त्रास

हद्दवाढ भागात खराब रस्त्यांचा विशेष त्रास होतो. वाहनांच्या वर्दळीने खडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमा झाली आहे. निकृष्ट कामावरून नागरिक संतप्त आहेत. अधिकारी मात्र त्यावर व्यक्त होताना दिसत नाही. सत्ता असताना नगरसेवकांवर दोष ढकलणारे अधिकारी प्रशासकीय कालावधीतही काहीच कारवाई करताना दिसत नाहीत. किमान अधिकाऱ्यांनी रस्त्यांची पाहणी करण्याची गरज आहे. ठेकेदारावर कारवाईचे पाऊल उचलण्याची गरज आहे. वर्षभरात दुरुस्ती न झालेल्या रस्त्याची पाहणी करून त्याच्‍या दुरुस्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

अशी आहे स्थिती

- रस्त्यावरून होताहेत निव्वळ आरोप, प्रत्यारोप

- रस्त्यांच्‍या कामांसह निविदा वाटपावरूनही प्रश्नचिन्ह

- संबंधित ठेकेदारांवरील कारवाईची घोषणा हवेतच

- रस्ता कारपेटचे कामही निकृष्ट झाल्याचे पावसाने स्पष्ट

- प्रशासकांच्या काळात तरी सोशल ऑडिट गरजेचे

- निकृष्ट कामे करणाऱ्यांची अनामत जप्त करणेही घोषणेपुरतेच

- हद्दवाढ भागात खराब रस्त्यांचा होतोय विशेष त्रास