कऱ्हाड (Karad) : शेणोली रेल्वे बोगद्यातील रस्त्याचे काम नुकतेच झाले; पण ते काम निकृष्ट झाल्याने रस्ता लगेचच उखडला आहे. यामुळे खड्डे पडून वाहनांना धोका झाला आहे. अशातच निवडणूक निरीक्षक व त्यांचा प्रशासकीय फौजफाटा या खड्ड्यात फसल्याने तीव्र संताप होऊन निरीक्षकांनी संबंधित ठेकेदाराला धारेवर धरले आहे.
बोगद्यातील रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आहे. रेल्वे प्रशासन हा प्रश्न गांभीर्याने घेत नाही. स्थानिकांनी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या महिन्यात बोगद्यातील रस्त्याचे काम केले; परंतु हे काम घाईगडबडीत झाल्याने लगेचच ते उखडत आहे. रस्त्याच्या गैरसोयीमुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. स्थानिक रहिवासी व प्रवाशांना या समस्येचा सतत सामना करावा लागतो.
तोच कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक व त्यांच्या यंत्रणेला याचा सामना करावा लागला. निवडणूक यंत्रणा संजयनगर येथे मतदान केंद्र निरीक्षण करण्यासाठी निघाली असताना बोगद्यात आल्यानंतर रस्त्याची गैरसोय व खड्डे या समस्येची त्यांना तीव्र जाणीव झाली. याबाबत लगेचच प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून रेल्वेच्या ठेकेदाराने कामाची उरक करत रस्त्याची मलमपट्टी केली. त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे.
दरम्यान, येत्या आठवड्यात रेल्वेच्या संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा निवडणूक प्रशासनाकडून दिला आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहे.
यादरम्यान शेणोली स्टेशन बोगद्याखालून अनेकदा निरीक्षक, मतदान अधिकारी, कर्मचारी ये-जा करणार आहेत. कर्मचाऱ्यांसह मतदान पेट्या घेऊन एसटी जाणार आहे. या रस्त्याची छोटी वाहने व बस जाण्यासारखी सध्या परिस्थिती नाही. रस्त्यावर साचलेले पाणी व पडलेले मोठे खड्डे, रस्त्यातून वर आलेले स्टीलचे बार यामुळे वाहने पंक्चर होऊन अपघात होण्याची शक्यता आहे.