सांगोला (Sangola) : सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतिक्षित स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेअंतर्गत चिकमहूद व इटकी या मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेचे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करणे व पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन क्षेत्र हस्तांतरित करणे, पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम तसेच अजनाळे गुरुत्वीय नलिकेद्वारे सांगोला शाखा क्रमांक ५ साठी फिडर नलिकेच्या कामाची पहिल्या टप्प्यातील सुमारे २९९ कोटी २१ लाख ३३ हजार रुपयांचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. या योजनेमुळे सुमारे ३९ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील २५० कोटींचे टेंडर एका आठवड्यात प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१९९७ मध्ये मंजूर झालेल्या ७३.५९ कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला २००० साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी १६ हजार एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते. सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरवात न झाल्याने मंजुरीनंतर २००६ साली याची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली. आमदार झाल्यानंतर आमदार शहाजी पाटील यांनी २०२० सालापासून या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून नव्याने १२ वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला. तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या या प्रकल्पाला २०२२-२३ च्या दरसुचीवर आधारित ८८३ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रत्यक्ष कामासाठी ७८९ कोटी ५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर आनुषंगिक कामासाठी ९२ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बंदिस्त नलिका करण्यासाठी २५७ कोटी ३४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तर पाणी वापर संस्था व प्रशिक्षण यासाठी ३ कोटी ५० लाख ६७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आस्थापना, संयंत्रे व इतर खर्चासाठी ९२ कोटी ८५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा करून या योजनेसाठी निधी उपलब्ध केला आहे.
या गावांना होणार लाभ
या योजनेतून दीड टीएमसी पाणी बंदीस्त वितरण नलिकेतून लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, वाकी शिवणे, नरळेवाडी, य.मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी व इटकी या गावांतील सुमारे ३३ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर अर्धा टीएमसी पाण्यातून सांगोला शाखा कालवा ५ वरील सुमारे ६ हजार एकर, असे एकूण ३९ हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे.