सोलापूर (Solapur) : सोलापूर जिल्ह्यातील नेत्याने प्रयत्न करून मिळविलेला, सोलापूर जिल्ह्यासाठी असणारा जिल्ह्यातील बॅरेज जलसंपदा विभागाने भीमा नदीवर वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे मंजूर केला आहे. या ठिकाणी असलेल्या कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजमध्ये करण्याच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. जलसंपदा विभागाने मान्यता देताना या कामासाठी ६७ कोटी ७१ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात भीमा, सीना, भोगावती, नीरा, माण, बोरी या प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांवर सध्या कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमध्ये पुरेसे पाणी साठत नाही. शेतकऱ्यांना मार्च ते मे या महिन्यात पाण्याचा प्रचंड तुटवडा भासतो. लातूर जिल्ह्यात मांजरा नदीवर ज्या पद्धतीने बंधारे काढून बॅरेज बांधले आहेत. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवरही बॅरेज असावेत. वडापूर बॅरेजसाठी शासनाची कासवगती मारक या मथळ्याखाली ‘सकाळ’ने २१ ऑगस्ट २०२४ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागाने १५ ऑक्टोंबर रोजी या संदर्भातील शासन निर्णय काढला आहे.
हे काम पूर्ण होण्यापूर्वी पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक आहे, ही जबाबदारी स्थानिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर ९८९ हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. वडापूर येथील कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा २००० मध्ये बांधण्यात आला आहे. बंधाऱ्याची लांबी २९० मिटर, उंची साडेचार मिटर आहे. या बंधाऱ्यात २ मिटर उंचीचे ९४ गाळे आहेत. या बंधाऱ्यामुळे वडापूर, मिरी, तामदर्डी, सिद्धापूर या चार गावातील शेतीला लाभ होतो.
वडापूरला धरण होणार हे मी व तालुक्यातील जनता अनेक वर्षांपासून फक्त ऐकतच होतो. २०१४ मध्ये मी येथून आमदार झाल्यानंतर याबाबतची माहिती घेतली, शासन दरबारी काहीच नसल्याचे समोर आले. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव पाठवून साधारणतः ३५ कोटींची तरतूद वडापूर बॅरेजसाठी करून घेतली. महाराष्ट्रात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्याने या कामाची टेंडर निघाली नाही. दरम्यानच्या काळात या प्रकल्पाची किंमत वाढली. शासनाने आता या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देत ६७ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भीमा-सीना जोडकालवा हा याच बॅरेजवरून होणार आहे. त्यासाठी शासनाने अर्धा टीएमसी पाणीही आरक्षित केले आहे. मंजूर झालेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी माझा पाठपुरावा राहील.
- सुभाष देशमुख, आमदार, सोलापूर दक्षिण