सोलापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) एक जूननंतर विविध स्तरावर भूखंड वाटप करण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती उठविण्यात आल्याचे आदेश अवर सचिव किरण जाधव (Kiran Jadhav) यांनी दिले आहेत.
वेदांत-फॉक्सकॉन (Vedant - Foxconn) कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील ५३६ उद्योजकांच्या भूखंड वाटपाला स्थगिती दिल्याने राज्यातील गुंतवणूक थांबल्याची बाब उजेडात आली होती. त्यानंतर राज्यस्तरावरील हालचाली गतिमान झाल्या होत्या. अखेर बुधवारी (ता. १९) उद्योजकांच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठविल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
तत्पूर्वी, ८ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार ही स्थगिती देण्यात आली होती. आता त्यावरील स्थगिती उठविण्यात आली असली तरीसुद्धा अंबरनाथ व टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड वाटप वगळता उर्वरित औद्योगिक क्षेत्रातील स्थगिती उठविल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील स्पर्धात्मक वातावरणात औद्योगिक विकासाची गती कायम राखण्यासाठी तसेच उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी ही स्थगिती उठविल्याचेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकशीचे आदेश
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने उद्योजकांना केलेल्या भूखंड वाटपाला ८ ऑगस्ट रोजी स्थगिती दिली होती. तरीपण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूखंड वाटप करून काही जमिनींचा ताबा दिल्याचे उघड झाले होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने त्यासंबंधीचा सविस्तर तपशील कागदपत्रांसह शासनाला तत्काळ सादर करावा, असे आदेश अवर सचिव किरण जाधव यांनी दिले आहेत.