Ujani Dam Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

उजनी जलाशयातील जीवघेण्या बोटप्रवासापासून मुक्तता; पुलाच्या कामासाठी टेंडर प्रसिद्ध

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील शिरसोडीला जोडणाऱ्या उजनी धरणावरील पुलाच्या एकूण प्रकल्पासाठी सुमारे चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रशासकीय मंजुरीचा अध्यादेश कार्यासन अधिकारी विवेक कांबळे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठीची टेंडरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी २८४ कोटी ५३ लाख रूपयांची प्रकल्प किंमत देण्यात येणार आहे.

कुगाव (ता. करमाळा) भीमा नदीकाठी असून त्याला भीमा नदीच्या पात्राने तीनही बाजूला वेढले आहे. कुगावच्या नदीपात्रासमोर सात गावांचे क्षेत्र असून यात सोगाव, वाशिंबे, गंगावळण, कळाशी, कालठण, शिरसोडी, पडस्थळ या गावांचा समावेश होतो. शिरसोडीपर्यंत पूल मंजूर झाल्याने मराठवाड्यात जाणेही सोयीचे झाले आहे. शिवाय जीव मुठीत घेऊन उजनी पात्रातून बोटीतून प्रवास करण्याची गरज उरलेली नाही. वेळेची बचत तर होतेच, त्यामुळे हा पूल अनेकार्थाने विकास घडवून आणेल, असे मत या भागातील गावकरी व्यक्त करीत आहेत.

मे महिन्यात बोटीतील सहाजण बुडाले

३९५ कोटी ९७ लाख ३२ हजार रूपयांचा निधी कुगाव-शिरसोडी पुलाच्या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. निविदा मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. मे महिन्यात उजनी जलाशयातून बोटीतून जाणाऱ्या सहा जणांना प्राणास मुकावे लागले. जोराच्या वाऱ्यामुळे बोट उलटल्याने ही घटना घडली होती. पुलाचे काम झाल्याने अशा पद्धतीने जीवावर उदार होऊन प्रवास करण्याची वेळ गावकऱ्यांवर येणार नाही.

कुगाव-शिरसोडी पुलाचे फायदे

या पुलामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी होईल.सध्या सर्वाधिक केळीची निर्यात उजनी बॅकवॉटर परिसरातून होते, मात्र पुलामुळे मुंबई बंदरावर जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होईल. भिगवण-टेंभूर्णी-कुंभेज असा पर्यटन त्रिकोण तयार होण्यास मदत होणार असून उजनी बॅकवॉटर परिसरातील गावांच्या विकासाला चालना मिळेल. इंदापूर आणि करमाळा तालुक्यातील अनेक गावांमधील उलाढाल वाढीसाठी पुलाची मदत होईल. पुणे-मुंबईच्या बाजारपेठांत माल पाठवण्याची उत्तम सोय होईल. धरणातील पाण्यात मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांचीही सोय होणार आहे. स्थानिकांना चांगला रोजगार यामुळे उपलब्ध होणार आहे.

सध्या कुगाव येथे जाण्यासाठी चार जलमार्ग व एक भूमार्ग मंजूर आहे. भूमार्गाने जाण्यासाठी १२० किलोमीटरचा नाहक वळसा मारावा लागतो तर जलमार्गाने जाण्यासाठी शासनाने चार मार्ग मंजूर केले आहेत. त्यापैकी सर्वात जवळचा मार्ग असलेल्या कुगाव ते शिरसोडी पूल मंजूर केल्याने या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे.

- तेजस्विनी दयानंद कोकरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत कुगाव (ता. करमाळा)